Sat, Jul 20, 2019 23:36होमपेज › Ahamadnagar › हमीभावाबाबत ‘तो’ अध्यादेशच नाही

हमीभावाबाबत ‘तो’ अध्यादेशच नाही

Published On: Sep 07 2018 1:04AM | Last Updated: Sep 06 2018 11:10PMनगर : प्रतिनिधी 

केंद्र शासनाने ठरवून दिलेल्या हमी भावापेक्षा कमी दराने शेतकर्‍यांचा माल खरेदी केल्यास संबंधित व्यापार्‍याला शिक्षा व दंड करण्याबाबत शासनाने कोणताही अध्यादेश काढलेला नाही. त्यामुळे बाजार समितीतील भुसार बाजार चालू करण्याचा निर्णय संयुक्‍त बैठकीत घेण्यात आला. त्यानुसार शेतकर्‍यांनी आपला शेतमाल विक्रीस आणावा, असे आवाहन बाजार समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

शेतकर्‍यांचा शेतीमाल केंद्र शासनाने ठरवून दिलेल्या हमी भावापेक्षा कमी दराने खरेदी केल्यास संबंधित व्यापार्‍याला 1 वर्षाची कैद व  50 रुपये हजार दंड करण्याबाबत प्रसार माध्यमांद्वारे जाहीर झाले होते. त्यामुळे राज्यातील सर्वच व्यापार्‍यांनी भुसार बाजार बंद ठेवला होता. नगर कृषी उत्पन्न बाजार समितीमधील व्यापार्‍यांनीही शेतमाल खरेदी करण्यास असमर्थता दर्शविली होती. राज्यातील कुठलीही बाजारपेठ चालू नसल्याने, खरेदी केलेला माल पुढे खरेदी करण्यास कोणी तयार नसल्याने सर्व भुसार बाजार बंद होते. 

सध्या मूग व उडदाचा हंगाम सुरू असून, शेतकर्‍याला मालाची विक्री करता न आल्यामुळे त्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होत होते. या पार्श्‍वभूमीवर भुसार बाजार चालू करण्यासाठी जिल्हा उपनिबंधक यांच्याकडील 3 सप्टेंबरचे व पणन संचालक(पुणे) यांच्याकडील 1 सप्टेंबरच्या पत्रानुसार नगर बाजार समितीने आडते बाजार मर्चंटस् असोसिएशनचे सर्व पदाधिकारी व खरेदीदार व्यापारी यांची बुधवारी (दि.5) समितीच्या सभागृहात संयुक्त बैठक घेतली. हमी भावाबाबत शासनाने अद्यापपर्यंत कोणताही अध्यादेश निर्गमित केलेला नसल्याचे स्पष्ट करीत, भुसार बाजार पूर्ववत चालू करण्याचे आवाहन बाजार समितीच्या संचालक मंडळाने केले. 

शेतमाल विक्री केल्यानंतर बर्‍याच दिवसांनी शेतकरी बाजार भावाबाबत तक्रार दाखल करतात, अशी तक्रार बैठकीत काही व्यापारी प्रतिनिधींनी केली. सदरचा शेतमाल विक्री झालेल्या दिवशीच खरेदीदार व्यापार्‍याने परपेठेत नेलेला असतो. त्यामुळे अशा मालाच्या बाजार भावाची तक्रार निर्धारित वेळेतच करण्यात यावी, अशी व्यापार्‍यांनी मागणी केली. जिल्हा उपनिबंधक कार्यालयाचे सहाय्यक निबंधक हरीष कांबळे यांनी शेतमाल लिलावाच्या वेळी शेतकर्‍यांनी समक्ष उपस्थित राहून काही तक्रार असल्यास लगेच बाजार समितीला कळविण्याचे आवाहन केले. प्रत्येक शेतकर्‍याने विक्रीसाठी आणलेल्या शेतमालाची नोंद समितीच्या गेटमध्ये करण्याबाबतही बैठकीत चर्चा झाली. बैठकीस समितीचे सभापती विलासराव शिंदे, उपसभापती रेश्मा चोभे यांच्यासह सर्व संचालक, सचिव अभय भिसे, जिल्हा उपनिबंधक कार्यालयाचे प्रतिनिधी कांबळे, पणन विभागाचे दिगंबर शिंदे, व्यापारी असोसिएशनचे मानद सचिव शांतीलाल गांधी, पेमराज पितळे, राजेंद्र बोथरा व व्यापारी उपस्थित होते.