Thu, Jun 27, 2019 09:39होमपेज › Ahamadnagar › विकास केल्याने विरोधकांना पोटदुखी!

विकास केल्याने विरोधकांना पोटदुखी!

Published On: Apr 15 2018 1:35AM | Last Updated: Apr 15 2018 12:22AMकर्जत :   प्रतिनिधी

विरोधकांना विकास सहन होत नसल्याने त्यांना पोटदुखी होत आहे. त्यामुळे ते केवळ माझ्या कामांमध्ये चुकाच शोधत आहेत. जी कामे केली, ती केलीच आहेत, यात खोटे काय. मात्र विरोधक हे स्वीकारण्यास तयार नाहीत, असे प्रतिपादन पालकमंत्री राम शिंदे यांनी कर्जत येथे केले.

पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांच्या हस्ते कर्जत येथे शासकीय दराने हमी भाव खरेदी केंद्राचा प्रारंभ करण्यात आला. निमगाव डाकू येथील विविध कार्यकारी सेवा संस्थेला हे खरेदी केंद्र सुरू करण्याची परावनगी नाफेडने दिली आहे. कर्जत येथे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात हे हरभरा हमी भाव खरेदी केंद्र सुरू करण्यात आले. 

यावेळी कर्जत नगरपंचायतीचे नगराध्यक्ष नामदेव राऊत, भाजपचे तालुकाध्यक्ष अशोक खेडकर, कुंभेफळचे सरपंच काकासाहेब धांडे, राजेंद्र भोसले, बाजार समितीचे सभापती श्रीधर पवार, उपसभापती प्रकाश शिंदे, शिवसेना नेते बळीराम यादव, संचालक डॉ. सुरेश भिसे, संचालक पप्पू नेवसे, भाजपचे शहराध्यक्ष रामदास हजारे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. 

ना. शिंदे म्हणाले, आपण तुकाई चारी, एसटी बसस्थानकाचे आधुनिकीकरण, सीना धरणात पाणी सोडण्याचा निर्णय, कुकडीचे नियमित आवर्तन आदी विषयांवर निर्णय घेतले. हे प्रश्न समाजाभिमुख आहेत. हे सुटले आहेत याची खात्री जनतेला आहे. मात्र तालुक्यातील काही विरोधी मंडळी यामध्ये चुका शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. हे प्रश्न तुम्ही सत्तेत असताना सोडवले असते, तर माझ्या चुका  शोधण्याची वेळ तुमच्यावर आली नसती. तालुक्यातील प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी मी प्रयत्नशील आहे. उलट विरोधकानी केलेल्या धडपडीमुळे मला कामे करण्याची प्रेरणा मिळते आहे. जलयुक्त शिवार योजनेमुळे दुष्काळी कर्जत तालुक्याची ओळख पाणीदार तालुका म्हणून झाली आहे. येथील पाणी टंचाई संपली आहे. 

गेल्या तीन वर्षांत येथे एकही टँकर सुरू करण्याची वेळ आली नाही. मी छोटा माणूस आहे पण माझे मन मोठे आहे. त्यामुळे अनेक प्रलंबित प्रश्न सोडविण्यात मी यशस्वी झालो, असे ना. शिंदे यांनी सांगितले. राज्यातील सरकार सदैव शेतकर्‍यांच्या पाठीशी उभे आहे. तूर, उडीद, मका, हरभरा यांची हमी भाव खरेदी केंद्र सुरू करून शेतकर्‍यांना दिलासा दिला आहे. शेतकर्‍यांना चांगली सेवा द्या. तालुक्यात दोन केंद्र सुरू केले आहेत. संपूर्ण हरभरा खरेदी होईपर्यंत हे केंद्र सुरू राहील, असे शेवटी सांगितले.


Tags : Growth Opponents Groove! belgaon news