Tue, Apr 23, 2019 20:20होमपेज › Ahamadnagar › सकल मराठा समाजाचा दिवसभर ठिय्या!

सकल मराठा समाजाचा दिवसभर ठिय्या!

Published On: Aug 10 2018 12:56AM | Last Updated: Aug 09 2018 10:14PMनगर : प्रतिनिधी

‘एक मराठा, लाख मराठा’, ‘आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं’, ‘जय भवानी, जय शिवराय’ असा जयघोष करत सकल मराठा समाजाने माळीवाडा बसस्थानकाशेजारील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर ठिय्या आंदोलन केले. गडबड, गोंधळ न करता शांततेत आंदोलन पार पाडले. आंदोलनाच्या पुढील टप्प्यात आजपासून सर्व तहसिल कार्यालय व जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत साखळी उपोषण करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.

शहरातील बाजारपेठा पूर्णत: बंद ठेवत व्यापार्‍यांनीही आंदोलनात सहभाग नोंदविला. माळीवाडा बसस्थानकाजवळ औरंगाबाद- पुणे महामार्ग रोखण्यात आला होता. यावेळी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, आ.संग्राम जगताप, महापौर सुरेखा कदम यांच्यासह अनेक नेते, अधिकारी वर्ग, वकील, शिक्षक, महिला, युवती, विद्यार्थी उपस्थित होते. 

मराठा समाजाच्या या आंदोलनाला मुस्लिम समाज, रिपब्लिकन पक्ष, भारिप  बहुजन पक्षाच्या नेत्यांनी पाठींबा देत आंदोलनात सहभाग घेतला. आंदोलन सुरु असताना मुस्लीम समाजाच्या वतीने आंदोलकांना पाणी व फळांचे वाटप करण्यात आले. मराठा समाज आंदोलनात ज्या आंदोलकांवर गुन्हे दाखल झाले त्यांचे खटले मोफत लढविण्यात येतील अशी घोषणा वकील संघटनेच्या पदाधिकार्‍यांनी केली. आजपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दररोज एका गावातील नागरिक साखळी उपोषण करणार आहेत. 

आंदोलनस्थळी स्टेज उभारण्यात आले होते. सकाळी सुरुवातीला मोर्चाच्या समन्वयकांची भाषणे झाली. त्यानंतर मराठा आरक्षणासाठी सरकारला जाग यावी यासाठी जागरण गोंधळ घालण्यात आला. जिल्हाभरातून आलेल्या बाल गोपाळांसह अनेकांची भाषणे झाली. अजय महाराज बारस्कर यांनी शिवाजी महाराजांवरील पोवाड्यांचे गायन केले. त्याला उपस्थितांनी दाद दिली. राष्ट्रगीताने आंदोलनाचा समारोप झाला.

शाळा महाविद्यालये बंद, परीक्षार्थींचे हाल

बंदच्या पार्श्वभूमीवर शहरातील बहुतांशी महाविद्यालये बंद ठेवण्यात आली. जिल्ह्यातील तब्ब्ल 800 शाळांना सुट्टी देण्यात आली होती. आयटीआयसह, अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांची परिक्षा होती. दुपारी अडीच वाजता परिक्षा असतांना ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना सकाळीच महाविद्यालयाकडे निघावे लागले. त्यातच सार्वजनिक वाहतूक बंद असल्याचे अनेकांना माहित नव्हते. त्यांचे यावेळी हाल झाले. अनेकांनी मोटारसायकलचा आधार घेतला.

काही भागात आंदोलनाला गालबोट

शहरात शांततेत सुरू असलेल्या आंदोलनाला काही ठिकाणी गालबोट लावण्याचा प्रयत्न झाला. प्रोफेसर चौकातील एका कॉफी शॉपच्या काचा फोडण्यात आल्या. एमआयडीसी परिसरात काही कंपन्या सुरु असल्याने त्या बंद करण्यासाठी तरुणांनी घोषणाबाजी केली. कंपणीच्या गेटवर दगडही फेकण्यात आले. यावेळी पोलिसांनी काही तरुणांना ताब्यात घेतले होते. त्यानंतर कंपन्यांसमोर बंदोबस्त तैनात करण्यात आला. केडगावमध्ये नगर पुणे महामार्गावर भूषणनगर चौकात टायर पेटविण्यात आले होते.

शहरात कडकडीत बंद

मराठा आंदोलनाच्या पार्श्‍वभूमीवर नगर शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला सर्व दुकाने, हॉटेल्स 100 टक्के बंद ठेवण्यात आले होते. शहराची प्रमुख बाजारपेठ असलेल्या कापडबाजार, गंजबाजार, आडते बाजार, डाळमंडई पूर्णपणे बंद होती. व्यापार्‍यांनी बंद पाळून आंदोलनास पाठींबा दिला. बंदमुळे बाजारपेठेत शुकशुकाट होता. शहरातील रस्ते, गल्लीबोळाही सामसूम दिसत होत्या.

पोलिसांचा चोख बंदोबस्त

आंदोलनाच्या पार्श्‍वभूमीवर पोलिसांनी शहरात चोख बंदोबस्त ठेवला होता. आंदोलनांचे व्हिडिओ रेकॉर्डिंग करण्यात आले. ड्रोन कॅमेरे सर्व परिस्थितीवर लक्ष ठेऊन होते. बंदोबस्तासाठी दीडशे अधिकारी, दोन हजार पोलिस कर्मचारी, 900 होमगार्ड, राज्य राखीव पोलिस दलाच्या दोन तुकड्या, 5 दंगल नियंत्रण पथके, 3 शीघ्र कृती दले व 1 राज्य राखीव पोलिस दलाचे पथक असा मोठा बंदोबस्त जिल्ह्यात तैनात होता.