Sat, Apr 20, 2019 07:54होमपेज › Ahamadnagar › पानोडी गावासाठी ‘विखे’ बनले जलदूत

पानोडी गावासाठी ‘विखे’ बनले जलदूत

Published On: Jul 07 2018 1:34AM | Last Updated: Jul 06 2018 10:16PMआश्‍वी : वार्ताहर

सरकारने पाणीपुरवठा टँकर बंद केल्याने संगमनेर तालुक्यातील पानोडी गावात पिण्याच्या पाण्याची मोठी टंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे लोकांची पाण्यासाठी वणवण सुरू असल्याने डॉ. सुजय विखे पाटील मित्रमंडळाच्यावतीने गावाला मोफत पाणीपुरवठा टँकर सुरू केले आहे. त्यामुळे पानोडी गावासाठी ‘विखे’ जलदूत बनून मदतीला धावल्याची भावना व्यक्त केली जात आहे.

भाजपा-शिवसेना युती सरकारने 1995 मध्ये पानोडीसह नऊ गावे पाणीयोजना सुरू केली होती. मात्र, अधिकारी व ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे ही योजना अर्धवटचं राहिली. लोकांचे शुद्ध पिण्याचे पाणी हे स्वप्नच राहिले.

गेल्या अनेक वर्षांसून लोकांना टँकरच्या पाण्याचीच सवय लागली. निसर्ग रुसल्याने पाऊस पडत नाही. त्यामुळेच वर्षांनुवर्ष लोकांना टँकरची सवय झाली. मात्र, सरकारच्या धरसोड वृत्तीमुळे लोकांच्या पाण्यासाठी वणवण ही नशिबीच आहे. मात्र, अडचणीच्या काळी डॉ. सुजय विखे पाटील मित्रमंडळाच्यावतीने पाणीपुरवठा  टँकर सुरू करून खरे संकट मोचक म्हणून डॉ. सुजय विखे भूमिका बजावत आहे.

सरकारने 1 जुलैपासून पाणी पुरवठा  टँकर बंद केल्याने लोकांची पाण्यासाठी वणवण होऊ नये, म्हणून सरपंच शांताबाई घुगे, उपसंरपच मनीषा कदम, राजेंद्र जाधव, पूजा नागरे, ग्रामसेविका रोहिणी नवले यांच्या मागणीवरुन डॉ. सुजय विखे मित्रमंडळाने पाणीपुरवठा टँकर त्वरित सुरू केल्याने लोकांनी सुटकेचा श्वास घेतला.दरम्यान, उपजिल्हाधिकारी राजेंद्र वाघ यांनी पानोडी गावाला भेट देऊन पाणीटंचाईची परिस्थितीचा आढावा घेतला. येथील लोकांची पाण्यासाठी वणवण असल्याची परिस्थिती पाहून पाणी टँकर सुरू करण्यासाठी लवकरच अहवाल तयार करून  एक-दोन दिवसांतच टँकर सुरू करण्याचे आश्वासन त्यांनी ग्रामस्थांना दिले.