Fri, Apr 26, 2019 03:33होमपेज › Ahamadnagar › साखर निर्यातीस अनुदान द्यावे

साखर निर्यातीस अनुदान द्यावे

Published On: May 26 2018 1:49AM | Last Updated: May 25 2018 11:00PMसोनई : वार्ताहर

देशात यंदा विक्रमी साखर उत्पादन झाले असून पुढच्या हंगामाच्या सुरूवातीला जवळपास शंभर लाख टन साखर शिल्लक राहणार आहे. अतिरिक्‍त साखरेच्या दरात 900 ते 1000 रूपयाने घसरण झाली असून बाजारात 2400 ते 2500 रूपये दर झाले आहेत. निर्यातीचे दरही 1600 ते 1700 रूपये क्विंटलपर्यंत खाली आहेत. साखरेच्या दरात सुधारणा होण्यासाठी केंद्र सरकारने किमान 50 लाख टनांचा बफर स्टॉक करून निर्यातीत होणारा तोटा भरून काढण्यासाठी अनुदान द्यावे, अशी मागणी मुळा कारखान्याच्या 40 व्या गळीत हंगामाच्या सांगता समारंभात ज्येष्ठ नेते यशवंराव गडाख यांनी केली.

सुरूवातीला कारखान्याचे जनरल मॅनेजर एस.एस. पटारे यांनी उपस्थितांचे स्वागत करून गळीत हंगामाची सविस्तर माहिती दिली. त्यापूर्वी सात उसतोडणी मुकादम व हार्वेस्टर मशिन चालकांनी सपत्नीक गळीत हंगाम समाप्‍तीची विधीवत पूजी केली. साखर कामगार फेडरशेनचे सरचिटणीस नितीन पवार, कारखान्याचे चेअरमन नानासाहेब तुवर, माजी संचालक कारभारी जावळे यांनी मनोगत व्यक्‍त केले. 
गडाख म्हणाले की, साखर कारखानदारीची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे. 2500 रूपयापर्यंत साखरेचे दर मिळत असताना ऊसाचे पेमेंट द्यायचे कसे, हा प्रश्‍न आहे. कारखान्यांना एफआरपीप्रमाणे पेमेंट देणे सुध्दा मुश्किल झाले आहे. बँकेकडून ऊस पेमेंटसाठी प्रतिक्विंटल 1440 रूपये मिळतात. बाकीची व्यवस्था इतर बँकांकडून कर्ज घेऊन करावी लागत आहे. पुढच्या हंगामात सुद्धा अतिरिक्‍त साखर उत्पादन होणार आहे. कारखान्यांना व ऊस उत्पादकांना बुरे दिन येण्याची शक्यता आहे. सरकार मात्र या सगळ्या परिस्थितीकडे उदासीन वृत्तीने पहात असून त्याचा फटका शेतकर्‍यांनाही बसणार आहे. 

सरकार मोठ्या उद्योगपतींना लाखो कोटी रूपायांची मदत करते. जनतेच्या पैशातून त्यांचे कर्ज माफ करते. मग शेतकर्‍यांनी उभी केलेली साखर कारखानदारी अडचणीत असताना केंद्र सरकारला मदत करायला काय हरकत आहे? असा प्रश्‍न गडाख यांनी उपस्थित केला. मुळा कारखान्याने ऊस संपण्यासाठी केलेल्या प्रयत्नांची प्रशंसा करून 11 लाख 47 हजार मे. टन ऊस गाळप करून 72 हजार मे. टन ऊस ऊसाचा दर दिला असला तरी त्याचा परिणाम कारखान्याच्या आर्थिक पत्रकांवर होणार असून पुढील वर्षीचा हंगामही आव्हानात्मक ठरणार असल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रमासाठी विश्‍वासराव गडाख, भैय्यासाहेब देशमुख, अशोकराव मंडलिक, बाजीराव, मुंगसे, भाऊसाहेब मोटे, जबाजी फाटके, रामजी पवार, नाथा घुले, तुकाराम शेंडे, सुनिल गडाख, अनिल अडसुरे, अशोक साळवे, बाळासाहेब नवले, शेतकरी संघटनेचे हरिभाऊ तुवर, प्रकाश जाधव, दादापाटील तनपुरे, आदी उपस्थित होते. 

पुढचं वरीस धोक्याचं 

पुढील वर्षीच्या गळीत हंगामात भरपूर उसाच्या नोंदी झालेल्या आहेत. सर्वच कारखान्यांकडे भरपूर ऊस आहे. कदाचित पुढच्या वर्षी आपल्याला जूनपर्यंत मुळा कारखाना चालवावा लागेल. उसावाल्या शेतकर्‍यांना आता राज्य व केंद्रात कोणी वाली राहिलेला नाही. त्यामुळे पुढचा हंगामसुध्दा आव्हानच ठरेल असे मत गडाख यांनी नोंदविले.