Tue, Jul 23, 2019 01:58होमपेज › Ahamadnagar › आजोबाचा खून, नातवाला जन्मठेप

आजोबाचा खून, नातवाला जन्मठेप

Published On: Jun 23 2018 1:20AM | Last Updated: Jun 22 2018 11:14PMनगर : प्रतिनिधी

दारू पिण्यासाठी पैसे न देणार्‍या आजोबाचा निर्घृण खून करणार्‍या नातवाला जिल्हा व सत्र न्यायालयाने जन्मठेप व दोन हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली. दंड न भरल्यास दोन महिने साधी कैद शिक्षा देण्यात आली आहे. जिल्हा व सत्र न्यायाधीश ए. एन. चौरे यांनी हा निकाल दिला. विशाल चांगदेव गायकवाड (रा. देवकर वस्ती, चौंडी, ता. जामखेड) असे आरोपीचे नाव आहे.याबाबत सविस्तर हकीगत अशी की, आरोपी विशाल हा आई-वडिलांसोबत पुण्यात राहत होता. तो सातत्याने दारू पिऊन भांडण करत असे. त्यामुळे त्याच्यात सुधारणा व्हावी, यासाठी विशालला गावी आजोबा चतुर्भुज निवृत्ती ढाळे यांच्याकडे ठेवले होते. आजोबांकडे राहायला आल्यावरही त्याच्यात बदल झाला नाही.

आजोबांकडे विशाल सातत्याने दारू पिण्यासाठी पैशांची मागणी करत होता. तसेच दारू पिऊन आल्यावर घरात भांडणेही करत होता. याच कारणावरून दि. 17 फेब्रुवारी 2016 रोजी विशाल याने आजोबा चतुर्भुज ढाळे यांच्या डोक्यात दगड घालून लोखंडी खोर्‍याने गंभीर जखमी करत त्यांना ठार मारले. त्यानंतर आरोपीने त्याच्या आईला फोन करून ‘तुझ्या बापाला मारले आहे’ अशा भाषेत घटना सांगितली.
याबाबत जामखेडच्या तेलंगशी येथील पोलिस पाटील अर्जून विश्वनाथ ढाळे यांनी जामखेड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यानुसार भादंवि कलम 302 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिस उपनिरीक्षक एन. एम. सहारे यांनी घटनेचा तपास करून न्यायालयात आरोपींविरुद्ध दोषारोपपत्र दाखल केले होते.संपूर्ण खटल्याचे कामकाज जिल्हा व सत्र न्यायाधीश ए. एन. चौरे यांच्याकडे चालले. सरकारपक्षाच्यावतीने एकूण आठ साक्षीदार तपासण्यात आले. न्यायालयाने परिस्थितीजन्य पुरावे ग्राह्य धरत आरोपीला जन्मठेपेची शिक्षा सुनावली. खटल्याचे कामकाज अतिरिक्त सरकारी वकील अनिल सरोदे यांनी पाहिले.