Sat, Jul 20, 2019 14:57होमपेज › Ahamadnagar › ग्रामसेवकांनी पंढरपुरात केला पर्यावरण, ग्रामविकासाचा जागर

ग्रामसेवकांनी पंढरपुरात केला पर्यावरण, ग्रामविकासाचा जागर

Published On: Jul 15 2018 1:28AM | Last Updated: Jul 14 2018 10:53PMनगर : प्रतिनिधी

महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियनचे राज्य अध्यक्ष एकनाथ ढाकणे यांच्या नेतृत्वाखाली नगरहून पंढरपूरला पायी गेलेेल्या प्रबोधन दिंडीचा समारोप पंढरपुरात पोपट पवार यांच्या उपस्थितीत झाला. ग्रामसेवकांच्या प्रबोधन दिंडीने पंढरपुरात मंदिर प्रदक्षिणा घालत विठु माऊलीच्या साक्षीने पर्यावरण, ग्रामविकास, स्वच्छतेचा संदेश दिला.

समारोपावेळी जिल्हा परिषद कर्मचारी महासंघाचे राज्य अध्यक्ष उमेशचंद्र चिलबुले, ग्रामसेवक युनियनचे राज्य अध्यक्ष एकनाथ ढाकणे, राज्य सरचिटणीस प्रशांत जामोदे, संजीव निकम, बापू आहिरे, उध्दव फडतरे, श्रीधर कुलकर्णी, शरद भुजबळ, पंढरपूर देवस्थान समितीचे सदस्य संभाजी शिंदे, साहेबलाल तांबोळी, सुनील नागरे, संपत दातीर, गंगाधर राऊत, सुरेश मंडलिक आदी उपस्थित होते.

सरपंच व ग्रामसेवक हे गावाच्या विकासरथाची दोन चाके आहेत. दोघांनीही समन्वयातून व दूरदृष्टीने कामांचे नियोजन करून लोकसहभागाची जोड दिल्यास अनेक आदर्श गावे निर्माण होतील. ग्रामसेवकांनी संतांची भूमी असलेल्या  नगर येथून पंढरपूरपर्यंत पायी प्रबोधन दिंडी काढून वृक्षारोपण व ग्रामविकासाच्या योजनांबाबत आदर्श असे प्रबोधन केले आहे. अध्यात्म आणि विकासाची सांगड घालत ग्रामसेवकांनी केलेला जागर आनंदी समाजाची निर्मिती करेल. यातूनच भविष्यात दुष्काळासारख्या प्रश्नांवर शाश्वत उपाययोजना शक्य होतील, असा विश्वास राज्य आदर्श गाव समितीचे कार्याध्यक्ष पोपट पवार यांनी व्यक्त केला.

ढाकणे म्हणाले की, ग्रामसेवक प्रबोधन दिंडीच्या उपक्रमात नगरसह राज्यातील ग्रामसेवकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. पायी मार्गक्रमण करताना गावागावात शासनाच्या कल्याणकारी योजनांची माहिती देणे, सेवा हमी कायदा, बेटी बचाओ बेटी पढाओ अभियान, स्वच्छता अभियान, नरेगा योजना, शौचालय वापर, निर्मल ग्राम, अंधश्रध्दा निर्मूलन, व्याख्याने, भारूड, लघुपटाच्या माध्यमातून संवाद साधण्यात आला. पंढरपूरपर्यंतच्या वाटेवर ठिकठिकाणी 11 हजार वृक्ष लागवड करण्यात आली. पंढरपूर देवस्थान समितीचे सदस्य संभाजी शिंदे यांनी नगरहून आलेल्या ग्रामसेवकांच्या दिंडीचे स्वागत करून दिंडीप्रमुखांचा सत्कार केला.