Wed, Jun 26, 2019 18:15होमपेज › Ahamadnagar › ग्रामसेवकांचे २४ ला राज्यभर मोर्चे

ग्रामसेवकांचे २४ ला राज्यभर मोर्चे

Published On: Jan 21 2018 2:43AM | Last Updated: Jan 20 2018 10:37PMनगर : प्रतिनिधी

धुळे जिल्ह्यातील ग्रामविकास अधिकारी एस.बी.वाघ यांनी पदाधिकारी व अधिकार्‍याच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केली. या प्रकरणाची सीआयडीमार्फत चौकशी करून दोषींवर गुन्हे दाखल करावेत, या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियनतर्फे24 जानेवारीला राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालये, जिल्हा परिषदांवर मूक मोर्चे काढण्यात येणार आहेत, अशी माहिती युनियनचे राज्य अध्यक्ष एकनाथ ढाकणे व राज्य सरचिटणीस प्रशांत जामोदे यांनी दिली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठविलेल्या निवेदनात ढाकणे यांनी म्हटले आहे की, ग्रामपंचायतीच्या नियमित कामकाजाव्यतिरिक्त इतर विभागाच्या कामाचा बोजा, आर्थिक पिळवणूक, मानसिक छळ, नियमबाह्य कामांसाठीचा दबाव यामुळे मागील दोन वर्षांत राज्यातील 40 ते 50 ग्रामसेवकांनी आत्महत्या केल्या आहेत. याशिवाय शेकडो ग्रामसेवक अपघातात जायबंदी झाले आहेत. सुमारे 1500 ग्रामसेवकांवर हल्ले होण्याचे प्रकार घडले. 

ग्रामसेवक संवर्ग केंद्र शासन, राज्य शासन व जिल्हा परिषदेच्या स्वउत्पन्नाच्या योजना, नागरिकांच्या मूलभूत गरजा अशी दैनंदिन कामे करीत असताना वरिष्ठ अधिकारी विना नोटिस निलंबित करणे, अतिरिक्त दबाव, वेतनवाढ बंद करणे, प्रसंगी आर्थिक पिळवणूक करणे, असे त्रासदायक प्रकार करतात. वैयक्तिक लाभाच्या योजनांतर्गत स्थानिक राजकारणातून नियमबाह्य लाभार्थी निवडीस भाग पाडले जाते. मनरेगा सारख्या मागणी आधारित योजनांसाठी उद्दीष्ट दिले जाते. अशा परिस्थितीत ग्रामसेवकांवर सातत्याने होणारे हल्ले, प्रशासकीय कारवाया यातून ग्रामसेवकांना नोकरी असुरक्षित वाटायला लागली आहे. त्यामुळे राज्य शासनाने ग्रामसेवकांवरील इतर विभागाच्या कामांचा अतिरिक्त बोजा संबंधित विभागाच्या कर्मचार्‍यांकडे सोपवावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.