होमपेज › Ahamadnagar › पाच लाखांच्या विम्यासाठी ग्रामसभा

पाच लाखांच्या विम्यासाठी ग्रामसभा

Published On: Apr 28 2018 1:41AM | Last Updated: Apr 28 2018 1:34AMनगर : प्रतिनिधी

केंद्र सरकारने अर्थसंकल्पात घोषित केल्यानुसार दारिद्रयरेषेखालील नागरिकांना आयुष्यमान भारत स्वास्थ्य विमा योजनेंतर्गत पाच लाखांपर्यंतचे सरकारी व खाजगी रुग्णालयात उपचार मोफत मिळणार आहेत. योजनेच्या अंमलबजावणीची पूर्वतयारी सरकारने सुरु केली असून, त्याअंतर्गत लाभार्थ्यांच्या याद्या तयार करण्यात आल्या आहेत. या याद्या व त्यातील लाभार्थ्यांच्या निश्चितीसाठी गावोगावी 30 एप्रिल रोजी विशेष ग्रामसभा घेण्यात येणार आहे.

आयुष्यमान भारत या योजनेसाठी केंद्र सरकारने मान्यता दिली. त्याअंतर्गत 2011 सालच्या सामाजिक, आर्थिक सर्वेक्षणाच्या याद्यानुसार दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांच्या याद्या तयार करण्यात आल्या. केद्र सरकारची महात्वकांक्षी योजना असलेल्या आयुष्यमान भारत  या योजनेअंतर्गत राष्ट्रीय आरोग्य सुरक्षा अभियान राबविण्यात येत आहे. त्याअंतर्गत आयुष्यमान भारत दिवस व ग्रामीण लाभार्थी पडताळणी, अतिरिक्त माहिती संकलन मोहिम 15 एप्रिल ते 21 मे दरम्यान राबविण्यात येत आहे.

30 एप्रिल रोजी प्रत्येक ग्रामपंचायतीत विशेष ग्रामसभा घेऊन या याद्यांचे वाचन करण्यात येणार आहे. ग्रामसभेला येताना सामाजिक व आर्थिक मागास प्रवर्गातील नागरिकांना मोबाईल व शिधापत्रिका घेऊन यावी लागेल. याद्यांची छपाई करून आरोग्य विभागाने याद्या ग्रामसेवकांकडे सुपूर्त केल्या आहेत. ग्रामसभेला जे ग्रामस्थ उपस्थित नसतील त्या ग्रामस्थांच्या घरी एएनएम व आशा कर्मचार्‍यांना जावे लागणार आहे. घरोघरी जाऊन एएनएम व आशा कर्मचारी याद्यांमधील नावे व माहितीची खात्री करतील. खात्री केलेली माहिती नंतर शासनाच्या पोर्टलवर अपलोड करावी लागणार आहे.

या सर्व कार्यक्रमाचे प्रशिक्षण अधिकारी व कर्मचार्‍यांना देण्यात आले आहे. ग्रामसभेमध्ये ग्रामसेवक, आरोग्य सेवक व आशा कर्मचार्‍यांच्या सहकार्याने अतिरिक्त माहिती छापील नमुन्यात गोळा करण्यात येणार आहे. त्यात कुटुंब प्रमुखाची माहिती फार्ममध्ये लिहली जाईल. कुटुंब प्रमुखाची माहिती उपलब्ध नसल्यास इतर सदस्यांची माहिती नोंदविण्यात येईल. तसेच  कुटुंबात अतिरिक्त व्यक्तिची माहिती भरणे, नावे वगळणे आदी माहिती संकलित करण्यात येणार आहे.

ग्रामसभा घेण्याबाबत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विश्वजित माने यांनी सर्व गटविकास अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी यांना पत्र पाठविले आहे. कामात हलगर्जीपणा न करता मोहीम यशस्वी करून त्याचा अहवाल कार्यालयास सादर करण्याचे निर्देशही त्यांनी दिले आहेत. राबविण्यात येत असलेले प्रधानमंत्री राष्ट्रीय स्वास्थ्य मिशन यशस्वी करण्याचे आवाहन अध्यक्षा शालिनी विखे, उपाध्यक्षा राजश्री घुले यांनी केले आहे.