Sun, May 26, 2019 19:54होमपेज › Ahamadnagar › ग्रामपंचायतींच्या निवडणुकीची चाहूल

ग्रामपंचायतींच्या निवडणुकीची चाहूल

Published On: Jul 09 2018 1:01AM | Last Updated: Jul 08 2018 11:29PMनगर : प्रतिनिधी

माहे ऑक्टोंबर 2018 ते फेब्रुवारी 2019 या कालावधीत मुदत संपणार्‍या ग्रामपंचायतींच्या निवडणुकीची तयारी राज्य निवडणूक आयोगाने सुरु केली आहे. प्रभाग रचना व आरक्षणापाठोपाठ आता मतदार यादी तयार करण्याचे आदेश आयोगाने दिले आहेत. त्यामुळे टाकळीमियाँ, घारगाव, बुरुडगाव, घोडेगाव, पानसवाडी, टाकळीमानूर आदींसह जिल्हाभरातील 68 गावांत  निवडणूक मोर्चेबांधणीला प्रारंभ झाला आहे.

ऑक्टोबर 2018 ते सप्टेंबर 2019 या कालावधीत जिल्हाभरातील 117 ग्रामपंचायतींच्या मुदती संपणार आहे. या गावांतील प्रभागरचना व आरक्षण ठरविण्याचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने गेल्या महिन्यातच जाहीर केला आहे. त्यानुसार महसूल व ग्रामीण विकास यंत्रणा कार्यकरत झाली आहे. प्रभागरचना व आरक्षण तयार झाले असून, 12 जुलै 2018 पर्यंत तहसीलदार यांच्या अध्यक्षतेखालील समिती या रचनेला मान्यता देणार आहे. त्यानंतर  प्रभागरचना व आरक्षण यादीवर हरकती आणि सूचना मागविल्या जाणार आहेत. 31 जुलैपर्यंत हरकती व सूचना निकाली काढल्यानंतर प्रस्ताव जिल्हाधिकारी यांच्याकडे सादर केला जाणार आहे. जिल्हाधिकारी 9 ऑगस्टपर्यंत प्रभाग रचनेला अंतिम मान्यता  देणार आहेत.

10 जुलैची मतदार यादी दरम्यान, माहे ऑक्टोबर 2018 ते फेब्रुवारी 2019 या कालावधीत मुदत संपणार्‍या जिल्हाभरातील 68 ग्रामपंचायतींच्या मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. या मतदार यादी कार्यक्रमासाठी 10 जुलै 2018 या दिवशी अस्तित्वात असलेली महाराष्ट्र विधानसभा मतदारसंघाची यादी वापरण्याचे निर्देश राज्य निवडणूक आयोगाने दिले आहेत. प्रभागरचना व आरक्षण 9ऑगस्टला पूर्ण होणार असून, मतदार यादीचे काम देखील याच महिन्यात पूर्ण होणार आहे. त्यामुळे येत्या ऑगस्ट महिन्यात जिल्ह्यात 68 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा  बिगुल वाजणार आहे.

नगर तालुक्यातील बुरुडगाव, राहुरी तालुक्यातील मुसळवाडी, टाकळीमियॉ, श्रीगोंदा तालुक्यातील घारगाव, कोपरगाव तालुक्यातील धामोरी,जामखेड तालुक्यातील जवळा, नेवासा तालुक्यातील घोडेगाव, बेलपांढरी, पानसवाडी, पाथर्डी तालुक्यातील टाकळीमानूर, करंजी, शंकरवाडी, संगमनेर तालुक्यातील सारोळे पठार, अकोले तालुक्यातील रतनवाडी, अंबित आदी राजकीयदृष्ट्या महत्त्वपूर्ण समजल्या गेलेल्या ग्रामपंचायतींसह 68 गावांत निवडणुकीची पूर्वतयारी सुरु झाली आहे.