होमपेज › Ahamadnagar › अठ्ठावीस गावांत येणार महिलाराज

अठ्ठावीस गावांत येणार महिलाराज

Published On: May 07 2018 2:00AM | Last Updated: May 07 2018 12:12AMनगर : प्रतिनिधी

जिल्ह्यातील 75 ग्रामपंचायतींच्या 27 मे रोजी सार्वत्रिक निवडणुका होत आहेत. त्यामुळे या गावांतील राजकीय वातावरण अधिकच तापले आहे. बारागांव नांदूर, चितळी, भानसहिवरा, दहिगाव बोलका आदीसह 28 ग्रामपंचायतींच्या सरपंचपदासाठी महिलांमध्येच लढत होणार आहे. नगर तालुक्यातील वडगाव गुप्‍ता व श्रीगोंदा तालुक्यातील लोणी व्यंकनाथ या दोन ग्रामपंचायतींच्या सरपंचपदी मात्र अनुसूचित जमातीची व्यक्‍ती विराजमान होणार आहेत.

माहे जून ते सप्टेंबर 2018 या कालावधीत जिल्हाभरातील 75 ग्रामपंचायतींची मुदत संपत असल्याने, राज्य निवडणूक आयोगाने निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार 27 मे 2018 रोजी या ग्रामपंचायतींसाठी मतदान होणार आहे. या निवडणुकीची नोटीस तहसीलदारांनी 27 एप्रिल रोजी प्रसिध्द देखील केली आहे. सोमवारपासून (दि.7 ) उमेदवारी अर्ज भरण्यास प्रारंभ होत आहे. सरपंचपदाची निवडणूक थेट जनतेतून होणार असल्याने, गावागावांतील वातावरण चांगलेच तापू लागले आहे.

जिल्हा प्रशासनाने सरपंचपदाचे आरक्षण तीन वर्षांपूर्वीच जाहीर केले आहे. त्यामुळे सरपंचपदासाठी आधीपासूनच इच्छुकांनी फिल्डींग लावली आहे. या निवडणुकीत 28 ग्रामपंचायतींचे सरपंचपद हे महिलांसाठी राखीव आहे. यामध्ये दहिगाव बोलका, सुरेगाव, घारगाव, भानसहिवरा आदी ठिकाणचे सरपंचपद हे सर्वसाधारण महिलेसाठी राखीव आहे. राहाता तालुक्यातील चितळीचे सरपंचपद हे ओबीसी महिलेसाठी तर राहुरी तालुक्यातील बारागांव नांदूरचे सरपंचपद हे अनुसूचित जातीच्या महिलेसाठी राखीव आहे. त्यामुळे या दोन्ही गावांतील प्रतिष्ठीत राजकीय नेत्यांची निराशा झाली आहे.या निवडणुकीनंतर जवळपास 28 गावांतील कारभार महिलांच्या हाती येणार आहे.

पारनेर तालुक्यातील वाडेगव्हाणच्या सरपंचपदी अनुसूचित जाती प्रवर्गातील व्यक्‍ती बसणार आहे. कान्हूरपठार येथील सरपंचपदाची निवडणूक मात्र चांगलीच चुरशीची होणार आहे. सरपंचपद हे सर्वसाधारण व्यक्‍तीसाठी असल्यामुळे इच्छुकांची संख्या अधिक असणार आहे.नेवासा तालुक्यातील मुकिंदपूर,सुरेगाव व राहुरी तालुक्यातील देसवंडी येथील सरपंचपद देखील सर्वसाधारण व्यक्‍तीसाठी असल्याने, या तीनही गावांत उमेदवारांची संख्या अधिक असणार आहे. राहुरी तालुक्यातील ब्राम्हणी ग्रामपंचायतीचे सरपंचपद हे ओबीसी व्यक्‍तीसाठी राखीव आहे. त्यामुळे येथील निवडणूक वातावरण देखील अधिकच तापणार आहे.

75 ग्रामपंचायतींसाठी एकूण 256 प्रभाग आहेत. प्रत्येक प्रभागातून तीन याप्रमाणे जवळपास 669 उमेदवार निवडले जाणार आहेत. यामध्ये सर्वसाधारण प्रवर्गातील 346, ओबीसी प्रवर्गातील 171, अनुसूचित जाती प्रवर्गातील 64 , अनुसूचित जमाती प्रवर्गातील 106 उमेदवारांचा समावेश असणार आहे.