Sat, Mar 23, 2019 12:00होमपेज › Ahamadnagar › पाटलांच्या बालेकिल्ल्यावर भिटेंचा डोळा

पाटलांच्या बालेकिल्ल्यावर भिटेंचा डोळा

Published On: Feb 12 2018 1:47AM | Last Updated: Feb 11 2018 10:59PMवांबोरी  : वार्ताहर

वांबोरीचे ज्येष्ठ नेते अ‍ॅड. सुभाष पाटील यांचा बालेकिल्ला समजल्या जाणार्‍या वार्ड क्रमांक 2 मधील पोटनिवडणुकीसाठी पारंपरिक विरोधक जि. प. चे माजी अध्यक्ष बाबासाहेब भिटे यांनी जोरदार व्यूहरचना आखल्याने निवडणुकीत चुरस निर्माण झाली आहे.  दि. 25 फेब्रुवारी रोजी होणारी ही निवडणूक दोन्ही गटांच्या दृष्टीने प्रतिष्ठेची बनली आहे. 

2017 मध्ये झालेल्या पंचायत समिती निवडणुकीत उदयसिंह पाटील यांनी वांबोरी गणातून विजय संपादन केला होता. त्यामुळे वांबोरी ग्रामपंचायत उपसरपंच व सदस्यत्वाचा त्यांनी राजीनामा दिल्याने हे पद रिक्त झाले होते. त्या जागेवर पोटनिवडणूक होणार आहे. 

गेल्या तीन वर्षांपूर्वी झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत ज्येष्ठ नेते अ‍ॅड. सुभाष पाटील आणि जि. प.चे माजी अध्यक्ष बाबासाहेब भिटे गटात चुरशीची निवडणूक झाली होती. यात पाटील गटाला 17 पैकी 14 जागा, तर भिटे गटाला केवळ 3 जागांवर समाधान मानावे लागले होते.

गेल्या चाळीस वर्षांपासून वांबोरीतील खोलेश्वर वॉर्ड नंबर 2 यामध्ये अ‍ॅड. पाटील गटाचे निर्विवाद वर्चस्व आहे. या वार्डातून अ‍ॅड. सुभाष पाटील, त्यांच्या पत्नी जि. प. सदस्या शशिकला पाटील आणि डॉ. तनपुरे कारखान्याचे अध्यक्ष उदयसिंह पाटील यांनी राजकीय जीवनाला सुरुवात केली आहे. त्यामुळे या वॉर्डाला पाटलांचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. मात्र या पोटनिवडणुकीत पाटलांच्या ताब्यातील ही जागा हिरावून घेण्यासाठी बाबासाहेब भिटे यांनी ताकद पणाला लावली आहे. वांबोरीत स्वतःचे कार्यालय सुरु करून त्यांनी व्यूहरचना आखली आहे. त्यातच त्यांना  युवानते प्राजक्त तनपुरे व जि.प.सदस्य शिवाजीराव गाडे यांचे पक्षीय पाठबळ मिळणार असल्याने वांबोरीत भिटे गट वरचढ ठरण्याची शक्यता नाकारता येणार नाही. 

तर दुसरीकडे तनपुरे कारखान्याचे अध्यक्ष उदयसिंह पाटील यांनी अ‍ॅड. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली या जागेसाठी जोरदार मोर्चेबांधणी केली आहे. त्यांना मानणार्‍या लोकांचा हा वार्ड असल्याने विरोधी गटाला येथे तुल्यबळ उमेदवार शोधावा लागणार आहे. तर पाटील गटाला मात्र येथे फारसी मेहनत घ्यावी लागणार नाही, असेच वरवर चित्र आहे. परंतु विरोधी गटाने ही निवडणूक प्रतिष्ठेची बनवल्याने पाटील गटानेही सावध पावित्रा घेवून तशी बांधणी सुरु केली आहे. त्यामुळे ही निवडणूक चुरशीची होणार आहे. 

दि. 12 फेब्रुवारीपर्यंत्त अर्ज भरण्याची मुदत असल्याने अनेक इच्छुकांनीही बंडखोरीची तयारी दर्शवली आहे. त्यामुळे निश्‍चितच ही निवडणूक चुरशीची होणार आहे, असे बोलले जाते.