Thu, Jun 27, 2019 02:23होमपेज › Ahamadnagar › प्रस्थापितांना धक्का देणारी निवडणूक!

प्रस्थापितांना धक्का देणारी निवडणूक!

Published On: Dec 29 2017 1:35AM | Last Updated: Dec 29 2017 12:42AM

बुकमार्क करा
श्रीगोंदा : अमोल गव्हाणे

तालुक्यातील आठ ग्रामपंचायत निवडणुकांचे निकाल काल जाहीर झाले. या निवडणुकीत तालुका पातळीवर काम करणार्‍या अनेक नेतेमंडळीना मतदारांनी नकार देत अक्षरशः धक्का दिला. या निवडणुकीच्या निमित्ताने मतदारांनी  मोठेपणाने मिरविणार्‍या अनेकांना जमिनीवर राहून काम करा, असाच काहीसा सल्ला दिला असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. 

दुसर्‍या टप्प्यातील आठ ग्रामपंचायतीचा निकाल काल हाती आला. गटातटाचा विचार केला तर सहा ग्रामपंचायती जगताप- नागवडे गटाच्या ताब्यात आल्या तर दोन माजी मंत्री पाचपुते यांच्या ताब्यात. गाव पातळीवरील निवडणूक असल्याने गावोगाव पॅनेल तयार करताना चांगलाच मचाळा झाला होता. त्यामुळे मतदारांनीही सावध भूमिका घेत योग्य उमेदवारालाच काम करण्याची संधी दिली हेच या निवडणुकीतून अधोरेखित होते.

देवदैठण ग्रामपंचायत निवडणुकीत जयश्री गुंजाळ यानी सरपंचपदी विजय मिळवत सुरेश लोखंडे यांचा पराभव केला. अत्यंत चुरशीच्या ग्रामपंचायत निवडणुकीत लोखंडे गटाला मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले. गाव पातळीवर झालेला पराभव लोखंडे गटाला आत्मचिंतन करायला लावणारा आहे. 

विसापूर निवडणुकीत आ. राहुल जगताप गटाने निर्विवाद वर्चस्व मिळवत बालेकिल्ला सुरक्षित असल्याचे दाखवून दिले. या ठिकाणी मिळवलेली एकहाती सत्त्ता विरोधकाना विचार करायला भाग पाडणारी आहे. अधोरेवाडी येथे आ. जगताप, नागवडे, पाचपुते गटाने सत्ता मिळवत ग्रामपंचायतीत सत्तांतर केले. सरपंचपदासाठी मनिषा भीमराज लकडे या पाच मतानी विजयी झाल्या. 

कोळगाव ग्रामपंचायत निवडणुकीकडे पूर्ण तालुक्याचे लक्ष लागले होते.  हेमंत नलगे आणि सभापती पुरुषोत्तम लगड यांच्या गटात चुरशीची लढत झाली. नलगे गटापेक्षा लगड गटाने एक जागा अधिक मिळवली असली तरी सरपंचपदाच्या उमेदवाराला पराभवाला सामोरे जावे लागले. नलगे गटाच्या वर्षा काळे यानी सरपंचपद मिळविले. सर्वात महत्वाची बाब म्हणजे सभापती लगड यांच्या सौभाग्यवतींना पराभवाला सामोरे जावे लागले. पंचायत समिती निवडणुकीत झालेल्या पराभवातून सावरत हेमंत नलगे यानी कोळगाव ग्रामपंचायत ताब्यात घेतली. 

पेडगाव येथे उपसभापती प्रतिभा झिटे यांच्या गटाला मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले. काँग्रेसचे राष्ट्रीय नेते हेमंत ओगले यांच्या गटाला अवघ्या एका जागेवर समाधान मानावे लागले. या निवडणुकीत कमबॅक केले ते राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष हरिदास शिर्के यांनी पंचायत समिती निवडणुकीत झालेला पराभव पचवत उभारी घेतली. हरिदास शिर्के आणि राजकुमार पाटील यानी एकत्र येऊन ग्रामपंचायतची सत्ता ताब्यात घेतली. 

आनंदवाडी ग्रामपंचायत निवडणुकीत पाचपुते- नागवडे गटाने सत्ता मिळवत जगताप गटाला पराभूत केले. टाकळी लोणार निवडणुकीत आ. जगताप, नागवडे गटाने एकहाती सत्ता मिळवत विरोधकांवर मात केली. टाकली लोणार येथील निवडणूक सुरूवातीपासूनच चुरशीची झाली होती. 

सगळ्यात महत्वाची निवडणूक ठरली मढेवडगाव ग्रामपंचायतची. या ठिकाणी तीन पॅनल तयार झाले होते. प्रा. फुलसिंग मांडे यानी गावातील तरुणाची मोट बांधत अपक्ष पॅनेल तयार केला होता. मतदारांनी नागवडे आणि पाचपुते गटाला नाकारत फुलसिंग मांडे यांच्या बाजूने कौल देत ग्रामपंचायतीत काम करण्याची संधी दिली. एकूणच ग्रामपंचायत निवडणुकीत मतदारांनी प्रस्थापित नेत्यांना नाकारत त्याना जमिनीवर राहून काम करण्याचा एक प्रकारे सूचक सल्ला दिला. निवडणुका जरी टोकाच्या झाल्या असल्या तरी गावच्या विकासासाठी सगळ्यानी एकत्र येऊन प्रयत्न केला तरच गावचा चेहरा मोहरा बदलणार आहे.