Mon, Jul 22, 2019 03:47होमपेज › Ahamadnagar › वसतिगृहातील मुलींना मिळतेय सडलेलेअन्न

वसतिगृहातील मुलींना मिळतेय सडलेलेअन्न

Published On: Jun 29 2018 12:54AM | Last Updated: Jun 29 2018 12:22AMजामखेड : प्रतिनिधी 

येथील मागासवर्गीय मुलींच्या शासकीय वसतिगृहात निकृष्ट दर्जाचे जेवण, सोयीसुविधांचा अभाव असल्याने त्रस्त झालेल्या मुलींनी थेट तहसीलदारांकडेच आपली कैफियत मांडली. तहसीलदारांनी वसतिगृहाला भेट देऊन याबाबत जिल्हाधिकार्‍यांना अहवाल पाठविण्यात येईल, असे सांगितले.  येथील सदाफुलेवस्ती परिसरात मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह आहे. मागील तीन वर्षांपासून या वसतिगृहात राहणार्‍या मुली काल (दि.28) दुपारी चारच्या सुमारास तहसील कार्यालयात आल्या. त्यांनी तहसीलदार विशाल नाईकवडे यांची भेट घेऊन वसतिगृहात निकृष्ट दर्जाचे जेवण मिळत आहे. पिण्याचे पाणीही अशुद्ध मिळत आहे. फळे मिळत नाहीत, मासिक भत्ता सहा महिन्यांनी मिळतो, स्टेशनरी भेटत नाही, गरम पाणी मिळत नाही, सांडपाण्याची व्यवस्था नाही, अशी कैफीयत मांडली. तसेच याबाबत वसतिगृह अधीक्षक व समाज कल्याण अधिकार्‍यांना निवेदन दिले. परंतु त्यांच्याकडून दुर्लक्ष करण्यात आल्याचा आरोपही या मुलींनी केला. 

आम्ही आजारी पडलो आता, तुम्हीच दखल घ्यावी, असे साकडे मुलींनी तहसीलदार विशाल नाईकवडे यांना घातले. तहसीलदार विशाल नाईकवडे यांनी तक्रारीची दखल घेऊन वसतिगृहाला भेट दिली. यावेळी मुलींनी त्यांना सर्व वसतिगृहाची स्थिती दाखविली. वसतिगृहाची पाहणी करून जिल्हाधिकार्‍यांना अहवाल पाठविण्यात येईल, असे आश्‍वासन तहसीलदार नाईकवाडे यांनी यावेळी दिले. तहसीलदारांना दिलेल्या निवेदनावर प्रिया भंडारे, राणी खताळ, मनीषा चव्हाण, दीक्षा औसामल, सोनाली स्वामी, अश्विनी सूर्यवंशी, अश्विनी नागरगोजे, सोनाली चौभारे, अर्चना भागवत, ऋतुजा खाडे, पूजा पाचरणे, राधा साठे, पूजा गव्हाळे यासह चाळीस मुलींच्या सह्या आहेत. 

वसतिगृहाची पाहणी करू : सहायक आयुक्त

सदर वसतिगृह आठ दिवसांपूर्वी सुरू झाले आहे. येथे सर्व सुविधा उपलब्ध आहेत. मासिक भत्ता शासनाकडून मिळाला की दिला जातो. वसतिगृहाला भेट देऊन पाहणी केली जाईल, असे सहायक आयुक्त विजय वाबळे यांनी सांगितले. 

ठेकेदाराने नेमला उपठेकेदार

वसतिगृह अधीक्षक करुणा ढवन यांनी जेवणाचा ठेका धुळे येथील सुनील ट्रेडर्सला दिला असून, हा ठेकेदार कधीच येत नाही. त्याने उपठेकेदार नेमलेले असल्याचे यावेळी सांगितले.