Sat, Nov 17, 2018 10:12होमपेज › Ahamadnagar › आरक्षणाबाबत सरकारचा वेळकाढूपणा : राधाकृष्ण विखे 

आरक्षणाबाबत सरकारचा वेळकाढूपणा : राधाकृष्ण विखे 

Published On: Sep 09 2018 2:11AM | Last Updated: Sep 09 2018 2:11AMजामखेड : प्रतिनिधी

धनगर, मराठा, मुस्लिम व लिंगायत समाजाचे हक्काचे आरक्षण फडणवीस सरकारने थांबविले आहे. आरक्षणाबाबत सरकार वेळकाढूपणा करत असल्याने, या समाजाचा सरकारवरील विश्‍वास उडत चालला आहे. सरकारने राजकीय भाषणबाजी बंद करून, विधानसभेत आरक्षणाचा प्रश्‍न निकाली काढण्याचा निर्णय घ्यावा. आम्ही सर्व विरोधी पक्ष एकमताने पाठिंबा देऊ, असे प्रतिपादन विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांनी केले. पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 224 व्या पुण्यतिथीनिमित्त चौंडी येेेथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. 

पक्षीय राजकारण बाजूला ठेवून चौंडीच्या विकासासाठी सदैव कटिबद्ध राहण्याचे आश्‍वासन विखे यांनी या वेळी दिले. आ. गणपतराव देशमुख यांनी धनगर आरक्षण प्रश्‍नावरून समाजात सुरू असलेल्या आंदोलनाचा जोर कायम ठेवण्याचे आवाहन केले. पालकमंत्री शिंदे म्हणाले की, आरक्षणाबाबतचे सर्व अहवाल राज्य सरकारकडे आले आहेत. आरक्षणाचा प्रश्‍न सुटला पाहिजे, यासाठी सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. 

धनगर समाज आरक्षणाबाबत कार्यकर्त्यांवर दाखल झालेले गुन्हे मागे घेण्याबाबत गृह विभागास निर्देश दिले आहेत. अण्णा डांगे यांनी चौंडीच्या विकासासाठी सर्वांनी प्रयत्नशील राहण्याचे आवाहन केले. दरम्यान, महिला बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे पाचच मिनिटे भाषण करून निघून गेल्याने उलटसुलट चर्चा सुरू होती.

यावेळी ग्रामविकास तथा महिला व बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे, पालकमंत्री प्रा.राम शिंदे, शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते आ. गणपतराव देशमुख, खा. विकास महात्मे, माजीमंत्री अण्णा डांगे, आ. रामहरी रूपनर, आ. शिवाजीराव कर्डिले, आ. मोनिका राजळे, माजी आमदार पोपट गावडे, रमेश शेंडगे, माजी नगराध्यक्ष चिमन डांगे, जिल्हा बँकेचे संचालक जगन्नाथ राळेभात, सभापती सुभाष आव्हाड यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

समाजबांधवांची कार्यक्रमाकडे पाठ!

अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती कार्यक्रमात झालेल्या गोंधळामुळे, समाजबांधवांनी पुण्यतिथीच्या कार्यक्रमाकडे पाठ फिरविल्याची चर्चा होती. जामखेड व कर्जतमधील समाजबांधवांची संख्या देखील नगण्य होती. पुण्यतिथीचा कार्यक्रम राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत घेण्यात येणार होता. परंतु, हे पालकमंत्री शिंदे यांना समजल्यावर त्यांनी विरोध केल्याचीही चर्चा होती.