Mon, Apr 22, 2019 15:40होमपेज › Ahamadnagar › माध्यमांवर सरकारचा दबाव?

माध्यमांवर सरकारचा दबाव?

Published On: Mar 10 2018 11:52PM | Last Updated: Mar 10 2018 11:45PMपारनेर : प्रतिनिधी

दिल्ली येथे 23 मार्चपासून होणार्‍या भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलनाकडे माध्यमांचे लक्ष नसल्याचा आरोप करून माध्यमांवर सरकारचा दबाव तर नाही ना, अशी शंका ज्येष्ठ समासेवक अण्णा हजारे यांनी व्यक्त केली. 

हजारे यांच्या उपस्थितीत जनआंदोलनाच्या समन्वय समितीची बैठक दिल्लीतील महाराष्ट्र सदन येथे पार पडली. या बैठकीत झालेल्या निर्णयांसदर्भात हजारे यांच्या राळेगणसिद्धी येथील कार्यालयाकडून प्रसिद्धीपत्रकाद्वारे माहीती देण्यात आली. समीतीचे 24 सदस्य या बैठकीस उपस्थित होते. 

माध्यमांकडून आंदोलनाकडे दुर्लक्ष होत असल्याने सोशल मीडियाचा जास्तीत जास्त वापर करण्याचे अवाहन हजारे यांनी केले. मिस्ड कॉल नंबरच्या प्रचार व प्रसाराकडे कार्यकर्ते लक्ष देत नाहीत. आपापल्या भागात प्रत्येक महाविद्यालयात मिस्ड कॉल नंबरचा प्रचार झाला पाहिजे. आंदोलनाच्या प्रचार व प्रसाराची प्रत्येकाची जबाबदारी असून तू मोठा की मी, हे दूर ठेवून एकमेकांना सहकार्य केले पाहिजे. आपले जीवन फार राहिलेले नाही. आपल्या पश्‍चातही हे आंदोलन सुरू राहिले पाहिजे. चारित्र्यशील लोकांचे संघटन तयार झाले तर कोणत्याही सरकारचे नाक दाबले की तोंड उघडले जाईल. असा दबावगट तयार होणे गरजेचे आहे. केवळ गर्दी करून उपयोग नाही तर चारित्र्यावर अधारीत आंदोलन झाले पाहिजे. 

आंदोलन सुरू झाल्यानंतर काही दिवस सत्याग्रह करावा. त्यानंतर काही दिवसांच्या प्रतिक्षेनंतर मागण्या मान्य झाल्या नाही, तर उपोषणाचा मार्ग अवलंबवावा अशी सूचना यावेळी काही सदस्यांनी केली. तर हजारे यांच्या तयार करण्यात आलेल्या छोट्या चित्रफिती प्रचारासाठी वापरण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. शहरी नागरीकांचे आंदोलनास समर्थन मिळविण्यासाठी जीएसटीच्या मुददा आंदोलनाच्या अजेंडयावर घेण्यात यावा, संख्या बळाबरोबरच आंदोलनास गुणवत्ताही हवी. वेळ पडली तर दिल्लीत भिक मागण्याची तयारी ठेवा. परंंतु हे आंदोलन थांबता कामा नये. सेनापती अण्णा हजारे हे प्राणत्यागाची तयारी ठेवीत असतील तर आपणही घर सोडताना परत येऊ शकणार नाही, असा निश्‍चय केला पाहिजे.

विविध शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींची हजारे यांच्या समवेत बैठक आयोजित करण्यात यावी. राज्य, जिल्हा तसेच तालुकास्तरीय समित्यांची लवकर नियुक्ती करावी, शेतक-यांच्या प्रश्‍नावर आवाज उठविणा-या सेलिब्रेटींना या आंदोलनासाठी आमंत्रीत करण्यात यावे, प्रचारासाठी कन्याकुमारी ते दिल्ली यात्रा काढण्यात यावी, आंदोलनातील शेतकर्‍यांच्या पेन्शनचा मुद्दा महत्वपूर्ण आहे, त्यासाठी शेतकरी वर्गातही जागृती करणे गरजेचे आहे. आंदोलनात भूमी अधिग्रहनाचा मुद्दा घेण्यात यावा, खासदारांना घेराव घालण्यासंदर्भात रणनीति आखण्यात यावी, अशा सूचनाही यावेळी करण्यात आल्या.