Mon, May 20, 2019 20:07होमपेज › Ahamadnagar › सरकारला डाळिंब उत्पादकांचा विसर

सरकारला डाळिंब उत्पादकांचा विसर

Published On: Jul 03 2018 1:50AM | Last Updated: Jul 03 2018 12:05AMश्रीरामपूर : गोरक्षनाथ शेजूळ

डाळिंब फळबाग लागवडीतून आर्थिक स्थैर्य मिळविण्याच्या प्रयत्नांत असलेल्या शेतकर्‍यांना सरकारचे चुकीचे धोरण व नैसर्गिक आपत्तीमुळे सातत्याने अपयश येत आहे. एकीकडे फळलागवडीसाठी प्रोत्साहन दिल्याने गेल्या 25 वर्षांत नियमित क्षेत्रापेक्षा तब्बल 1.26 हजार हेक्टर डाळिंब क्षेत्र वाढले आहे. त्यातून 11 लाख मे. टन. इतकी उत्पादनातही वाढ झाली आहे. मात्र, याकडे सरकारचे दुर्लक्ष असल्याने आज डाळिंबाला 15 ते 20 रुपये कवडीमोल भाव मिळत आहे. त्यातून उत्पादन खर्च आणि उत्पन्न याचा कुठेही ताळमेळ बसत नाही. त्यामुळे मेटाकुटीस आलेल्या डाळिंब उत्पादकांना दिलासा देण्यासाठी सरकारने विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात  सर्वच फळमालाला हमीभाव जाहीर करावा, अशी अपेक्षा आहे. 

देशाच्या तुलनेत महाराष्ट्रात डाळिंबाचे क्षेत्र, उत्पादन आणि उत्पादकता यांचा आलेख चढता आहे. गेल्या सात-आठ वर्षांचा आढावा घेतल्यास गेल्या वर्षापर्यंत्त तब्बल 1100 हजार मे.टन. उत्पादन वाढले होते. 2016-17 मध्ये देशात 2521.01 हजार मे.टन. तर महाराष्ट्रात 1613.44 हजार मे.टन. इतके उत्पादन निघाले आहे. विशेष म्हणजे शेतकर्‍यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत उत्पादकाही वाढवली आहे. त्यामुळे गेल्यावर्षी प्रति हे. 11.49 मे.टन. उत्पादन वाढले आहे. 

एकीकडे डाळिंबाचे क्षेत्र वाढते असताना दराबाबत नेहमीच डाळिंब उत्पादकांच्या पदरी निराशाच पडली आहे. डाळिंब लागवडीपासून ते बहार धरून फळतोडीपर्यंत लहान मुलांप्रमाणे त्या बागेचे संगोपन केले जाते. लाखो रुपये खर्चून कधी रोगांमुळे, तर कधी दर गडगडल्याने फळे बांधावर फेकून द्यावी लागतात. एका रात्रीत कोट्यधीश करणारे पीक म्हणूनही डाळिंबाच्या क्षेत्रात वाढ होऊ लागली. मात्र, कष्टाने पिकविलेले हेच फळ शेतकर्‍यांना रस्त्यावर आणत आहे. गेल्या काही दिवसांपासून डाळिंबाचे दर घसरल्याने डाळिंब उत्पादक शेतकर्‍यांच्या डोळ्यात पाणी आले आहे. 

गेल्या जूनच्या डाळिंब दरावर नजर टाकल्यास डाळिंब उत्पादकांची व्यथा जाणवल्याशिवाय राहणार नाही.  नगर जिल्ह्यात राहाता, राहुरी, संगमनेर, अकोले बाजार समितीमध्ये 1 जून रोजी सरासरी 90 रुपये किलो भाव मिळाला होता. 29 जून रोजी हाच भाव 25 रुपयांवर आला. अशीच परिस्थिती राज्यातील इतर बाजार समित्यांमध्येही होती.  मुंबई फ्रुट मार्केटला 1 जून रोजी 100 रुपये किलो, तर 30 जून रोजी 60 रुपये किलोचे भाव निघाले.अर्थात मुंबईचा भाव व्यापार्‍यांनाच काहीसा दिलासा देणारा ठरला.

वरीलप्रमाणे नगर, औरंगाबाद, नागपूर, जळगाव, अमरावती, नाशिक, सातारा, सांगली, पुणे, मुंबई या डाळिंबाचे आगार समजल्या जिल्ह्यातील डाळिंब भावावर नजर टाकल्यास येथे काही मालाला उच्चतम भाव निघाले असले तरी सरासरी मात्र घसरती आहे. या महिनाभरातच डाळिंबाचे भाव साधरणता 150 रुपये किलोवरून 17 रुपयांपर्यंत आल्याचे केविलवाणे चित्र आहे. दि. 4 जुलैपासून विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू होत आहे. त्यात डाळिंबासह अन्य फळांना हमीभाव देण्याबाबत सकारात्मक चर्चा होऊन ठोस निर्णय होण्याची अपेक्षा आहे. अन्यथा नेहमीप्रमाणेच चहापानावर बहिष्कार आणि गोंधळामध्ये हे अधिवेशन गुंडाळल्यास शेतकर्‍यांचे नेते म्हणविणार्‍यांना शेतकरी कधीच माफ करणार नाहीत. 

साई ब्रँडिंगद्वारे पेरू व डाळिंबचा प्रश्‍न सुटेल

जिल्ह्यात 28 हजार 700 हेक्टरवर डाळिंब बागा असून पेरू उत्त्पादनही लक्षणीय आहे. त्यामुळे नगर व शेजारील जिल्ह्यातील डाळिंब आणि पेरूंवर शिर्डीसारख्या ठिकाणी प्रोसेसिंग करून साईभक्तांना प्रसाद म्हणून यापासून बर्फी, लाडू आणि पेढे बनवले तर निश्‍चितच फळबागधारकांना चांगली बाजारपेठ मिळणार आहे. तसेच डाळींब आणि पेरूंपासून बनवलेल्या या प्रसादाचे ‘साई’ ब्रॅण्डींग करून संस्थानलाही फायदा होणार आहे. त्यासाठी संस्थानने तिजोरीत पडून असलेल्या पैशांचा वापर करण्याची गरज आहे. - बाबासाहेब गोरे, तज्ज्ञ डाळिंब उत्पादक, राहाता