Sun, Aug 25, 2019 12:17होमपेज › Ahamadnagar › साखर कारखान्यांबाबत सरकार उदासीन

साखर कारखान्यांबाबत सरकार उदासीन

Published On: Apr 26 2018 1:24AM | Last Updated: Apr 26 2018 12:13AMसंगमनेर : प्रतिनिधी

बुलेट ट्रेन, समृद्धी महामार्ग आणि मेट्रो सिटी बनविताना सध्याच्या सरकारचे शेतकर्‍यांकडे मात्र दुर्लक्ष झाले आहे. साखरेचे भाव 25 हजारांनी खाली उतरले आहेत. त्यामुळे उत्पादनखर्च भागवून ऊस उत्पादक शेतकर्‍यांना चांगला भाव देणे अवघड झाले आहे. साखर कारखानदारीसंदर्भात केंद्र सरकारचे धोरण चुकीचे असल्यामुळे यात शेतकरी खर्‍या अर्थाने भरडला जात असल्याची टीका काँग्रेस नेते, माजी महसूल व कृषिमंत्री आ. बाळासाहेब थोरात यांनी केली.

सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात साखर कारखान्याच्या गळीत हंगामाच्या सांगताप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी कारखान्याचे अध्यक्ष अ‍ॅड. माधवराव कानवडे होते. व्यासपीठावर आ. डॉ. सुधीर तांबे, बाजीराव खेमनर, नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे, रणजितसिंह देशमुख, शिवाजीराव थोरात, भाऊसाहेब कुटे, रामदास वाघ, हरिभाऊ वर्पे, मधुकरराव नवले, शंकर खेमनर, लक्ष्मणराव कुटे, इंद्रजित  थोरात, अजय फटांगरे, नवनाथ अरगडे, कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर उपस्थित होते. यावेळी आ.बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते कारखान्याच्या गव्हाणीत मोळी टाकून यावर्षीच्या हंगामाची सांगता करण्यात आली.

आ. थोरात म्हणाले की, यावर्षी सर्वत्र चांगला पाऊस झाल्याने ऊस उत्पादन वाढले. येथे साखर उतारा ही 11.48 इतका मिळाला. 175 दिवस कारखाना निर्विघ्नपणे चालला. यात परमेश्‍वराचे आशिर्वाद, शेतकर्‍यांचे कष्ट, अधिकारी, कामगार, ऊस तोडणी मजूर या सर्वांचे मोठे योगदान आहे. नवीन कारखाना तालुक्याच्या विकासातील मोठे पर्व ठरला असून यावर्षी विक्रमी 11 लाख 41 हजार मे. टनांचे गाळप झाले आहे. 30 मेगावॅट वीजनिर्मितीतून कारखान्याला चांगले उत्पन्न मिळाले आहे. काटकसर व गुणवत्ता कायम जपताना चांगला भाव शेतकर्‍यांना दिला आहे. राजहंस सहकारी दूध संघ मात्र चांगल्या दराने दूध खरेदी करीत आहे. ग्राहकांना दूध स्वस्त देण्यासाठी त्या उत्पादनावर सरकारने अनुदान द्यावे, असे त्यांनी सांगितले.

आ. तांबे म्हणाले की, सध्याच्या सरकारचे सर्व धोरणे पूर्ण चुकीची आहेत. सर्वत्र सावळा गोंधळ आहे. दररोज पेट्रोल व डिझेलचे भाव वाढत आहेत. शेतकर्‍यांना मदत न करता उद्योगपतींना मदत होत आहे. मागील चार वर्षांत फक्त जाहिरातबाजी व भूलथापा देण्याचे काम या सरकारने चालविले आहे.एकही रोजगारनिर्मिती केली नाही. नोटाबंदीसारखा घातक निर्णय घेतला.आता सर्वसामान्यांच्या उपजिविकेचे साधन असलेला सहकार उद्ध्ववस्त करून पाहत आहे. निवडणुका आल्या की भावनिक मुद्दे काढून मनपरिवर्तन करतात. प्रत्येकाने जाणीवपूर्वक लक्ष देऊन या निवडणुकीत जातीयवादी व समाजात तेढ निर्माण करणार्‍या या सरकारला दूर करावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. 

कारखान्याचे अध्यक्ष माधवराव कानवडे म्हणाले की, साखर कारखान्याने 2300 रुपये टनांप्रमाणे भाव वेळेत दिला. कार्यक्षेत्रातील सभासद व बाहेरील ऊसउत्पादकांना हाच भाव दिला आहे. मागे काही महिन्यांपूर्वी काही मंडळींनी आंदोलने केली. त्यात एकही सभासद व ऊस उत्पादक नव्हता. मात्र, त्यांनी राजकीय हेतूने प्रेरित होऊन त्यांनी आंदोलन केल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला. 

कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर यांनी प्रास्ताविकात आपण 11 लाख 41 हजार टनांचे गाळप यशस्वी पूर्ण करुन 13 लाख 10 हजार क्विंटल साखरेचे उत्पादन केले असल्याचे सांगितले. सूत्रसंचालन नामदेव कहांडळ तर आभार मधुकरराव नवले यांनी मानले.