Thu, Apr 25, 2019 12:10होमपेज › Ahamadnagar › सरकारी बँक कर्मचार्‍यांचा संप सुरू

सरकारी बँक कर्मचार्‍यांचा संप सुरू

Published On: May 31 2018 1:33AM | Last Updated: May 30 2018 11:51PMनगर : प्रतिनिधी

युनायटेड फोरम ऑफ बँक युनियनच्या वतीने पुकारण्यात आलेल्या दोन दिवसांच्या देशव्यापी संपात शहरातील सरकारी बँकांच्या कर्मचार्‍यांनी सहभागी होत चितळेरोड येथे निदर्शने केली. संपामुळे  राष्ट्रीयीकृत बँका बंद असल्याने नागरिकांची मोठी गैरसोय झाली.

दि. 30 ते 31 मे या दोन दिवसांच्या देशव्यापी संपाची सुरुवात झाली आहे. वेतनवाढ करार त्वरित अस्तित्वात यावा, सन्मानजनक वेतन आणि सेवाशर्ती मिळाव्यात, बँकींग उद्योगातील सर्वांचा समावेश वेतनवाढी करारामध्ये व्हावा , आदी मागन्यांसाठी हा संप पुकारण्यात आला आहे. या संपात सर्व राष्ट्रीयीकृत बँकांमधील अधिकारी व कर्मचार्‍यांच्या 9 संघटनांनी सहभाग नोंदविला आहे. नगरमध्ये चितळेरोड येथे कर्मचार्‍यांनी निदर्शने केली. याप्रसंगी कॉ.कांतीलाल वर्मा, उल्हास देसाई, माणिक अडाणे, उमाकांत कुलकर्णी, वैभव रत्नपारखी, संदीप फंड, शिवाजी पळसकर, महादेव भोसले, कमल सरोज, राहुल भळगट, रावसाहेब निमसे, सुभाष तळेकर, सुजित उदरभरे, कोळपकर, साखरे, संदीप सरोदे आदींसह युनियनचे पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

यावेळी बोलतांना कांतीलाल वर्मा म्हणाले, बँक कर्मचार्‍यांच्या मागण्यांसह विविध प्रलंबित प्रश्‍नांबाबत वेळोवेळी शासनाकडे पाठपुरावा केला. परंतु, त्यास कोणत्याही प्रकारचा प्रतिसाद मिळाला नाही. तसेच गेल्यावेळी केलेल्या संपात शासनाने कर्मचार्‍यांच्या मागण्या मान्य करून त्या पूर्ण करण्याचे आश्‍वासन दिले होते. परंतु, आजही त्या मागण्या मान्य झालेल्या नाहीत. म्हणून आज पुन्हा देशव्यापी संप पुकारण्यात आला आहे. त्यामुळे शासनाला या मागण्यांचा जरुर विचार करावा लागेल. नाही तर पुढील काळात याहून तीव्र स्वरुपाचे आंदोलन करण्यात येईल. तसेच आज (दि. 31) सकाळी भारतीय स्टेट बँक लालटाकी शाखा येथे पुन्हा निदर्शने करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.