Sat, Jan 19, 2019 01:27होमपेज › Ahamadnagar › गोसावी समाज बहिष्कार प्रकरण; समेटासाठी प्रयत्न सुरू

गोसावी समाज बहिष्कार प्रकरण; समेटासाठी प्रयत्न सुरू

Published On: Apr 29 2018 2:10AM | Last Updated: Apr 28 2018 11:35PMकोपरगाव : प्रतिनिधी

तालुक्यातील देर्डे चांदवड येथील गोसावी समाजाच्या 9 कुटुंबीयांना गावाने बहिष्कृत केल्यानंतर गावकरी व गोसावी समाजात समेट घडविण्याच्यादृष्टिने महसूल, पोलिसांचे प्रयत्न सुरू आहेत. दरम्यान, काल पोलिसांनी मकवाणी कुटुंबातील फिर्यादीचे इनकॅमेरा जबाब नोंदवल्याचे समजले.

दोन दिवसांपासून देर्डे चांदवडचे ग्रामस्थ व गोसावी समाजात समेट घडविण्याचे प्रयत्न सुरू असून, तशी बैठकही दोनवेळा घेण्यात आली. तहसीलदार किशोर कदम, गटविकास अधिकारी कपिल कलोडे, तलाठी, ग्रामसेवक, सरपंच व गावातील वरिष्ठ नागरिक यांच्याशी चर्चा करण्यात आली आहे.गोसावी समाजाला पाणी, किराणा, दळण आदी जीवनावश्यक वस्तू मिळाव्यात, म्हणून संबंधितांना आदेश देण्यात आले आहेत. त्यांना प्रथम पाण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. 

बाबूलाल मकवाणी म्हणाले की,  गावातील गिरणीवरील महिलेने तुम्ही दळण दळण्यासाठी आणू नका, असे फर्मावले असून गावातील किराणा दुकानदाराने मात्र किराणा भरून दिला असल्याचे मकवानी यांनी सांगितले. दरम्यान, फिर्यादी मकवानी कुटुंबीय व काही महिला कालही ग्रामीण पोलिस ठाण्यात बसून होत्या. त्यांचे इन कॅमेर्‍यामध्ये जाब-जबाब घेण्याचे काम पो. हे. कॉ. एस एन भताने करीत आहेत. या प्रकरणात अद्यापि सबळ पुरावे मिळाले नाहीत. त्यामुळे आरोपी चौघांना अद्यापि अटक केली नाही, असेही भताने यांनी सांगितले. 

जिल्हा पोलिस प्रमुख रंजनकुमार शर्मा यांनी वरिष्ठ पातळीवरून दखल घेतल्याने या समाजात व गावकर्‍यांत समेट घडविण्याचे प्रयत्न सुरू आहेत, असे खात्रीलायक समजले. तसे झाले, तर गोसावी समाजही झाले गेले विसरून परत आम्ही आता गुण्यागोविंदाने राहण्यास तयार आहोत, असे फिर्यादी मनोज मकवानी यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.