होमपेज › Ahamadnagar › झेडपीच्या शाळेला पुन्हा अच्छे दिन! 

झेडपीच्या शाळेला पुन्हा अच्छे दिन! 

Published On: Jun 21 2018 1:29AM | Last Updated: Jun 20 2018 11:06PMश्रीरामपूर : प्रतिनिधी

जिल्हा परिषद मराठी माध्यमाच्या शाळेच्या वाढत्या गुणवत्तेमुळे तालुक्यात मागील चार वर्षांत 524 विद्यार्थी इंग्रजी माध्यमाच्या शाळेतून जिल्हा परिषदेच्या शाळेत दाखल झाले आहेत. त्यामुळे इंग्रजी शाळांनी मराठीचा चांगलाच धसका घेतला असून इंग्रजी व मराठी माध्यमाच्या शाळांमध्ये विद्यार्थी पट वाढविण्यासाठी स्पर्धाच सुरू झाली आहे. मात्र, पालकांचा कल मराठी शाळेकडे वाढत असल्याचे चित्र दिसत आहे.

श्रीरामपूर तालुक्यात जिल्हा परिषदेच्या 122 शाळांमधून विद्यार्थ्यांना शिक्षण दिले जाते. बदलत्या काळानुसार मुलांना दर्जेदार शिक्षण मिळावे, हा हेतू मनात ठेवून अनेक पालकांनी आपली मुले इंग्रजी माध्यमाच्या शाळेत दाखल केली. मात्र, इंग्रजी माध्यमांच्या शाळांचे शुल्क न पेलवल्याने तसेच अवास्तव शुल्क वसूल केले जात असल्याने पालकांचा इंग्रजी शाळांबद्दलचा मतप्रवाह बदलला आहे. त्यामुळे अनेकांनी आपली मुले इंग्रजी माध्यमातून काढून थेट जिल्हा परिषदेच्या शाळांत दाखल केली आहेत. 

मागील चार वर्षांत तालुक्यातील इंग्रजी माध्यमांच्या शाळांतून सुमारे 524 विद्यार्थी जिल्हा परिषदेच्या शाळेत दाखल झाली आहेत. त्यामध्ये 2015 मध्ये 97 विद्यार्थी, 2016 मध्ये 116 विद्यार्थी, 2017 मध्ये 168 विद्यार्थी, तर 2018 मध्ये 143 विद्यार्थी असे एकूण 524 विद्यार्थी मराठी शाळेत दाखल झाली असून, चालू वर्षासाठी प्रवेश प्रक्रिया अजून सुरू आहे. अनेक विद्यार्थी मराठी शाळेत येऊन बसत आहेत. मात्र, काहींचे दाखले अद्यापि उपलब्ध झाले नाहीत.

त्यामुळे चालू वर्षी विद्यार्थी संख्या वाढण्याची शक्यता आहे.  मराठी शाळेत पहिलीपासून मिळणारे सेमी इंग्रजीचे शिक्षण, विद्यार्थी गुणवत्ता वाढीसाठी विविध उपक्रम, शिष्यवृत्ती परीक्षा, बुद्धिमत्ता चाचणी परीक्षा अशा विविध परीक्षांमुळे विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढत आहे. याचाच परिपाक म्हणजे मराठी माध्यमांकडे विद्यार्थ्यांचा वाढत चाललेला कल आहे.  दरम्यान, तालुक्यात इंग्रजी माध्यमाच्या शाळेमधून शिक्षणाचे बाजारीकरण होत चालल्याचे चित्र आहे. दरवर्षी वाढत असलेले शुल्क, शुल्क न भरल्यास पालकांची होणारी अडवणूक, सांस्कृतिक कार्यक्रमांची अवास्तव शुल्क, शाळेत विविध उपक्रम राबविताना ‘शुल्क’ ची अट अन्यथा विद्यार्थ्यांना सहभाग नाकारणे इत्यादी कारणांमुळे इंग्रजी माध्यमाच्या शाळांबद्दल कल बदलून मराठी माध्यमाच्या शाळांची ग्रामीण व शहरी  पालकांना ओढ लागली आहे.

जिल्हा परिषदेतून गुणवत्तापूर्ण शिक्षण

तालुक्यातील 471 जिल्हा परिषद शिक्षकांकडून ग्रामीण भागातील पालकांमध्ये जिल्हा परिषद मराठी शाळेच्या गुणवत्तेविषयी प्रबोधन करण्यात येत आहे. आज मराठी माध्यमाच्या शाळेमधूनही गुणवत्तापूर्ण शिक्षण देऊन विद्यार्थी घडविण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केले जात आहे. त्यामुळेच मराठी माध्यमाकडे विद्यार्थी संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. 
- सुनील सूर्यवंशी, गटशिक्षणाधिकारी, पंचायत समिती श्रीरामपूर