होमपेज › Ahamadnagar › गोल्ड क्लस्टरचे काम प्रगतिपथावर

गोल्ड क्लस्टरचे काम प्रगतिपथावर

Published On: Jul 05 2018 1:36AM | Last Updated: Jul 05 2018 12:49AMसावेडी : सोमनाथ मैड

राज्य सरकारच्या सहभागातून नगर शहरात उभारल्या जाणार्‍या गोल्ड ऑर्नामेंट क्लस्टरमध्ये जागतिक स्तरावरील सोने-चांदी क्षेत्रातील विविध मशिनरी उपलब्ध झाल्या असून, क्लस्टरसाठी लागणारा कच्चा माल (सोने-चांदी) एमएटीसी लिमिटेडकडून मागणी करणार असल्याचे गोल्ड ज्वेलर्स कौन्सिलचे चेअरमन प्रकाश लोळगे यांनी ‘पुढारी’शी बोलताना सांगितले.

राज्य सरकार व जिल्हा उद्योग केंद्राच्या माध्यमातून 6 कोटी 21 लाख रुपये खर्च करुन नगर शहरात कंपनी उभारण्यात येत आहे. या प्रकल्पात दागिने करणार्‍या कारागिरांसाठी आधुनिक यत्रंणा असलेल्या कास्टिंग, हॉलमार्किंग, कॅड कॅम, रिफायनरी लेझर शोल्डिग, पॉलिसिंग रोलिंग मिल, इनग्रेव्हींग कटींग, चेन मेकिंग, डिझाईन सेंटर अशी आत्याधुनिक यंत्रे दाखल झाली आहेत. या कंपनीचे काम आता अंतिम टप्यात असून, शहरातील रामचंद्र खुंट येथील करशेटजी रोड येथे 3 हजार चौरस फुटांमध्ये क्लस्टर उभारणीचे काम प्रगतीपथावर आहे.

या ठिकाणी शहरासह जिल्ह्यातील सराफ व्यवसायिकांना ‘ना नफा ना तोटा’ तत्वावर सोने-चांदीची कामे स्वस्त दरात करुन मिळणार आहेत. त्यामुळे  सराफ व्यवसायिकांना पुणे, मुंबई, येथे सोने-चांदीची कामे करण्यासाठी जाण्याची गरज पडणार नाही. तसेच क्लस्टरमध्ये पंतप्रधान मुद्रा योजना, सराफ व्यवसायिकास दागिन्यांचे प्रदर्शनाबरोबरच दागिन्यांची विक्री करण्याची सुविधा कंपनीमध्ये मिळणार आहे. तसेच या ठिकाणी मशिनरीसाठी लागणार्‍या कच्चामाल (सोने-चांदी) गरज पडणार असल्याने चेअरमन लोळगे एमएटीसीकडे कच्च्या मालाची मागणी करणार असल्याचे सांगितले.