Mon, Aug 19, 2019 07:49होमपेज › Ahamadnagar › गोदावरीच्या नव्या पुलाची होणार स्वप्नपूर्ती

गोदावरीच्या नव्या पुलाची होणार स्वप्नपूर्ती

Published On: Sep 10 2018 1:15AM | Last Updated: Sep 09 2018 11:16PMपुणतांबा : वार्ताहर

सात वर्षांपूर्वी सर्वेक्षण झालेल्या शिर्डी-औरंगाबादचे अंतर तब्बल 50 कि. मी. ने कमी करणार्‍या गोदावरी नदीवरील नवीन पुलाचे स्वप्न लवकरच पूर्ण होणार आहे. नुकतेच सार्वजनिक बांधकाम राज्यमंंत्री ना. प्रवीण पोटे यांनी या पुलाच्या कामाचा नाबार्डमध्ये समावेश करून आवश्यक निधी उपलब्ध करून दिला जाईल, अशी ग्वाही दिली आहे. तसेच या पुलाचा प्रस्ताव तातडीने सादर करण्याचे आदेशही नगर सा. बां. विभागाला त्यांनी दिल्याने 15 ते 20 गावांतील ग्रामस्थांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.

सर्वपक्षीय कृती समितीच्या वतीने पुणतांबा-बापतरा असा गोदावरी नदीवर पूल व्हावा, यासाठी गेल्या आठ-दहा वर्षांपासून प्रयत्न सुरू आहेत. सा. बां. विभागाने या पुलाचे सर्वेक्षण केलेले असून, अंदाजे 10-15 कोटी रुपये खर्चाच्या पुलाच्या कामाचा सन 2010-11 च्या पुरक अर्थसंकल्पात समावेश करण्यात आला होता. मात्र त्यानंतर कुठलीही कार्यवाही न झाल्याने ग्रामस्थांत नाराजी व्यक्‍त केली जात आहे.

वैजापूर तालुक्यातील गोदावरी नदीकाठावरील 15 ते 20 गावांचा राहाता तालुका व पुणतांब्याशी दैनंदिन व्यवहार आहे. शेकडो शालेय विद्यार्थी येथेच शिक्षणसाठी येत असतात. मात्र गोदावरी नदीला पाणी आल्यानंतर पाच ते सहा महिने शेतकरी, विद्यार्थी, ग्रामस्थ, रुग्णांना मोठे अंतर कापत कसरत करत याठिकाणी यावे लागतो. या प्रस्तावित पुलाजवळून मुंबई-नागपूर महामार्ग गेलेला आहे. तसेच नियोजित समृद्धी महामार्गावर बापतरा-लाखगंगा पुरणगाव या गावाजवळ कृषी समृद्धी केंद्र उभारण्यात येणार आहे. त्याचबरोबर औरंगाबाद-शिर्डी हे अंतर 50 कि. मी. ने कमी होणार असून, नगर जिल्ह्यापासून जगप्रसिद्ध वेरूळ व अजिंठा लेण्यांसाठी जवळचा मार्ग होऊ शकणार आहे. 

शेतकर्‍यांच्या शेतमालासाठी राहाता, कोपरगाव, श्रीरामपूर, वैजापूर, गंगापूर या तालुक्यांसाठी बाजारपेठ उपलब्ध होऊ शकणार आहे. नगर-औरंगाबाद जिल्ह्यांच्या विकासाला चालना मिळणार आहे. नदीकाठावरील चार-पाच गावांतील विद्यार्थ्यांना शाळेसाठी येतांना होडीचीही सोय नसल्याने जीव धोक्यात घालून वसंत बंधार्‍यावरून ये-जा करावी लागते. मात्र हा प्रश्‍नही मार्गी लागणार आहे.

या प्रस्तावित पुलासाठी निधी उपलब्ध व्हावा, यासाठी  ना. पोटे यांची वैधानिक विकास महामंडळाचे संचालक डॉ. भागवत कराड, औरंगाबाद जिल्हा भाजपाचे सरचिटणीस मोहन आहेर, गोदावरी पूल कृती समितीचे केशव मोरे, प्रभाकर गाडेकर, शिवाजी गंगुले, वैभव कुलकर्णी, रावसाहेब मुकिंद, नाना गुंजाळ, शिवाजी शेटे, दादा मगर आदींनी भेट घेऊन निवेदनाव्दारे लक्ष वेधले. दरम्यान, या पुलाचा नाबार्डमध्ये समावेश करून निधी उपलब्ध करून दिला जाणार असल्याचे आश्‍वासन   ना. पोटे यांनी दिले आहे.