Thu, Jun 20, 2019 00:33होमपेज › Ahamadnagar › निळवंडेसह गोदावरीचा निधी पळविला!

निळवंडेसह गोदावरीचा निधी पळविला!

Published On: May 26 2018 1:49AM | Last Updated: May 25 2018 11:03PMनगर : प्रतिनिधी

एकीकडे निळवंडे धरणाच्या कालव्यांच्या कामासाठी, नाशिकच्या ऊर्ध्व गोदावरी प्रकल्पाच्या कामांसाठी निधी देण्याची मागणी होत असतांना असलेल्या निधीतून कपात करून निधी पळविण्याचा प्रकार समोर आला आहे. नाशिक जिल्ह्यातल्या भाम धरण प्रकल्पासाठी निळवंडे 2, ऊर्ध्व गोदावरी प्रकल्प व अन्य लहान-मोठ्या प्रकल्पांचा 48 कोटींचा निधी वळती करण्याचा प्रस्ताव लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाच्या अधीक्षक अभियंता अ. ह. अहिरराव यांनी दिला आहे. यावरून पुन्हा नगर, नाशिक विरुद्ध मराठवाडा संघर्ष पेटण्याची शक्यता आहे.

विरोधीपक्षनेते राधाकृष्ण विखे यांनी हा निधी देण्यास विरोध दर्शविला होता. निळवंडे धरणाचे काम जवळपास पूर्ण झाले असून, त्याच्या लाभक्षेत्रातील कालव्यांची कामे सद्यस्थितीत सुरु आहेत. ऊर्ध्व प्रवरा प्रकल्प (निळवंडे 2)साठी शासनाने 2018-19 सालासाठी 158 कोटींचा निधी मंजूर केला आहे. त्यातील 15 कोटींचा निधी भाम धरण प्रकल्पासाठी देण्यात येणार आहे. त्यामुळे निळवंडे 2 च्या कामासाठी 143 कोटी 84 लाखांचा निधी शिल्लक राहणार आहे.

त्याचप्रमाणे नाशिक जिल्ह्यातल्या ऊर्ध्व गोदावरी प्रकल्पासाठी राज्य सरकारने सन 2018-19 साठी 101 कोटी 50 लाखांचा निधी मंजूर केला. त्यापैकी 15 कोटी रुपये भाम प्रकल्पासाठी देण्यात येणार आहे. त्यामुळे ऊर्ध्व गोदावरी प्रकल्पासाठी अवघे 86 कोटी 50 लाख रुपये शिल्लक राहणार आहेत. तसेच दोन्ही जिल्ह्यातल्या लहान-मोठ्या कामांसाठी 32 कोटी 98 लाखांचा निधी शासनाने मंजूर केला होता. त्यापैकी 17 कोटी 98 लाख रुपये भाम धरण प्रकल्पाला वळते करण्यात येणार आहेत. निळवंडे 2 च्या निधीतून 15 कोटी जाणार असल्याने निळवंडे धरणाच्या सुरु असलेल्या कालव्यांच्या कामाला निधीची टंचाई जाणवू शकते. नाशिक जिल्ह्यातल्या  ऊर्ध्व गोदावरी प्रकल्पासाठी गेल्या वर्षी सरकारने निधी उपलब्द्ध करून दिला. त्यातूनही 15 कोटी जाणार असल्याने या प्रकल्पालाही घरघर लागणार आहे. तसेच नगर व नाशिक जिल्ह्यातील लहान-मोठ्या सिंचन प्रकल्पांसाठी 32 कोटींची तरतूद आहे. त्यातील अर्धा निधी थेट भाम धरण प्रकल्पासाठी वळता होणार असल्याने या लहान-मोठ्या प्रकल्पांचेही भवितव्य धोक्यात आले आहे.

सद्यस्थितीत प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजनेंतर्गत भाम प्रकल्पाच्या घळभरणी व पुनर्वसनाचे काम सुरु आहे. या प्रकल्पाच्या कामासाठी निधी आवश्यक होता. त्यासाठी राज्य सरकारने स्वतंत्र तरतूद करण्याऐवजी नगर, नाशिक जिल्ह्यातल्या प्रकल्पांच्या निधीवर डल्ला मारण्याचा डाव आखल्याचे दिसून येते. लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाच्या प्रस्तावास मान्यता मिळाल्यानंतर हा निधी वर्ग होणार आहे.

निधी नगर, नाशिकचा, लाभ मराठवाड्याला

भाम धरण हे नाशिक जिल्ह्यातील आहे. धरणासाठीची जमीनही नाशिकचीच आहे. धरणाच्या कामासाठी नगर व नाशिक जिल्ह्यातला निधी देण्यात येत असला तरी, धरणाच्या पाण्याचा लाभ मात्र मराठवाड्याला होणार आहे. भाम धरणातील पाणी नांदूर मध्यमेश्वर बंधार्‍यात येते. त्याठिकाणहून एक्सप्रेस कालव्यांद्वारे हे पाणी मराठवाड्यातील वैजापूर व गंगापूर तालुक्यांमध्ये पोहचविण्यात येते.