Thu, Jun 27, 2019 12:30होमपेज › Ahamadnagar › शेतकर्‍यांना पीककर्ज द्या

शेतकर्‍यांना पीककर्ज द्या

Published On: Apr 28 2018 1:41AM | Last Updated: Apr 28 2018 12:13AMनगर : प्रतिनिधी

जिल्ह्यातील प्रत्येक बँकांनी खरीप हंगामासाठी पीककर्ज मागणीसाठी  येणार्‍या शेतकर्‍यांना कर्ज द्यावे. बँकांनी त्यांच्या सर्व शाखांना तसे निर्देश द्यावेत. पीककर्जापासून कोणताही गरजू शेतकरी वंचित राहणार नाही, याची काळजी बँकांनी घ्यावी. पीककर्ज वाटपात बँकांनी कामगिरी सुधारावी, असे स्पष्ट निर्देश जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी दिले आहेत. 

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन भवनात खरीप पीककर्ज वाटपाचा आढावा जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी घेतला. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विश्वजित माने, नाबार्डचे जिल्हा विकास व्यवस्थापक राकेश पांगत, जिल्हा अग्रणी बँक अधिकारी गौरव कुमार, जिल्हा उपनिबंधक  अनिलकुमार दाबशेडे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक परिक्षित यादव, सेंट्रल बँक ऑफ इंडियाचे उदय सालियन आदींची उपस्थिती होती.

यावेळी जिल्हाधिकारी श्री.  द्विवेदी यांनी, बँकनिहाय खरीप कर्ज वाटपाचा आढावा घेतला. आतापर्यंत पीककर्ज वाटपात बँकानी समाधानकारक कामगिरी केलेली नाही. वास्तविक शेतकर्‍यांना खरीप हंगामापूर्वी खते, बी-बियाणे, कीटकनाशके खरेदी करण्यासाठी शेतकर्‍यांना पैशांची गरज असते. त्यामुळेच वेळेवर कर्ज मिळाले तर त्याचा लाभ शेतकर्‍यांना होतो. मात्र, बँका नेमक्या या काळातच उदासीन असल्याबाबत त्यांनी नाराजी व्यक्त केली. बँकांनी  मेअखेरपर्यंत त्यांच्या कर्जवाटपात लक्षणीय सुधारणा करुन, शासनाने दिलेले उद्दिष्ट् पूर्तीसाठी प्रयत्न करावेत, असे त्यांनी नमूद केले.