Sun, May 26, 2019 19:01होमपेज › Ahamadnagar › मुलींच्या शाळेसाठी वर्गखोल्या द्या

मुलींच्या शाळेसाठी वर्गखोल्या द्या

Published On: Jul 13 2018 12:47AM | Last Updated: Jul 12 2018 10:57PMपारनेर : प्रतिनिधी

शहरातील जिल्हा परिषदेची मुलींची शाळा मोडकळीस आल्याने सर्व वर्ग आंबेडकर भवनामध्ये भरविण्यात येत आहेत. त्यात विद्यार्थिनींचे नुकसान होत असून वर्गखोल्यांची तातडीने व्यवस्था करण्याची मागणी उपनगराध्यक्ष चंद्रकांत चेडे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने सभापती राहुल झावरे यांच्याकडे सोमवारी केली. 

कालबाह्य झालेली मराठी मुलींची शाळा धोकादायक झाल्याने या शाळेतील सर्व वर्ग बाजार तळावरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवनामध्ये भरविण्यात येत आहे. भवनात एकच मोठा हॉल असल्याने अध्ययन करताना विद्यार्थिनींचे लक्ष विचलित होऊन शैक्षणिक नुकसान होत आहे. या शाळेत सर्वसामान्य नागरिकांच्या मुली शिक्षण घेत असून त्यांना न्याय मिळाला पाहिजे, अशी आग्रही मागणी करतानाच जिल्हा परिषदेच्या शाळांची पटसंख्या वाढत असताना जिल्हा परिषदेकडून वर्ग खोल्यांची व्यवस्था करणे आवश्यक असल्याची भूमिका  यावेळी मांडण्यात आली.

तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या 87 ते 88 शाळांच्या इमारती धोकादायक झाल्या असून विद्यार्थी मंदिरांत, समाजमंदिरांत तसेच झाडाखाली धडे गिरवीत आहेत. या शाळांच्या बांधकामसाठी शिक्षण विभागाकडे निधी नाही. यासंदर्भात अण्णा हजारे यांच्यामार्फत मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा करण्यात आला. परंतु त्यांच्याकडूनही निधी उपलब्ध नसल्याचे उत्तर आले. पंचायत समितीकडे वर्षाकाठी वर्गखोल्यांसाठी अवघे दोन लाख रूपये येतात. त्यातून काम करणे अशक्य असल्याचे झावरे म्हणाले. वर्गखोल्यांसाठी साईबाबा देवस्थाकडून 10 कोटी रूपयांचा निधी उपलब्ध होणार आहे. त्यातून पारनेरच्या शाळेसाठी निधी उपलब्ध करून देण्यासाठी आपण प्राधान्याने प्रयत्न करू, असे आश्‍वासन झावरे यांनी शिष्टमंडळास दिले. शिष्टमंडळात नंदकुमार देशमुख, अर्जुन भालेकर, नंदकुमार औटी, विशाल शिंदे, बापू शिंदे यांचा समावेश होता.