Sun, Aug 18, 2019 21:14होमपेज › Ahamadnagar › पिण्याच्या पाण्याचे टँकर तातडीने द्या

पिण्याच्या पाण्याचे टँकर तातडीने द्या

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

संगमनेर : प्रतिनिधी

राज्यात मोठा गाजावाजा करुन सुरू केलेल्या जलयुक्त शिवार योजनेचा दुष्काळी भागात काहीही फायदा झाला नाही. उन्हाची तीव्रता वाढल्यामुळे तालुक्यात पाणीपातळी घटली असून प्रशासनाने पिण्याच्या पाण्याला एक नंबरचे प्राधान्य देत मागणीनंतर त्या ठिकाणी तातडीने टँकर सुरू करावा, अशा सूचना माजी महसूल मंत्री आ. बाळासाहेब थोरात यांनी प्रशासनाला दिल्या आहेत.

पंचायत समितीच्या सभागृहात झालेल्या टंचाई आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी थोरात कारखान्याचे संचालक इंद्रजित थोरात, सभापती नीशाताई कोकणे, जि. प. कृषी समितीचे सभापती अजय फटांगरे, उपसभापती नवनाथ आरगडे, अविनाश सोनवणे, शिवाजीराव थोरात, आर.बी. राहणे, जि.प. सदस्य रामहरी कातोरे, प्रांताधिकारी भागवत डोईफोडे, तहसीलदार साहेबराव सोनवणे, गटविकास अधिकारी सुरेश शिंदे उपस्थित होते. 

यावेळी आ. थोरात म्हणाले, संगमनेर हा कमी पर्जन्यछायेचा तालुका आहे. तळेगाव व पठार भागात पाण्याची मोठी वणवण आहे. कोणत्याही गावातून व वाडी-वस्तीवरून टँकर मागणीचा प्रस्ताव आल्यावर तातडीने टँकर द्यावा. पिण्याच्या पाण्याला पहिले प्राधान्य असू द्यावे. सरकारने मोठा गाजावाजा करून सुरू केलेली जलयुक्त शिवार योजनेचा पूर्ण गोंधळ आहे. लोकांना पाणी पाहिजे घोषणा नको. प्रशासनाचा सर्वत्र गोंधळ सुरू आहे. अनेक तांत्रिक अडचणी, कागदपत्रे, विविध दाखले सांगून जनतेला अडविले जात आहे. हे योग्य नाही. काँग्रेस आघाडी सरकारच्या काळात ग्रामीण भागातील नागरिक शेतकर्‍यांना अडचणी येऊ दिल्या नाहीत. 

सध्या मात्र ऑनलाईनच्या नावावर उडवाउडवी केली जाते. हे अत्यंत वाईट आहे. हे थांबले नाही, तर लोक रस्त्यावर उतरतील. मागील काळात दुष्काळात तालुक्यात व राज्यात आपण उत्कृष्ट दुष्काळ नियोजन केले. मात्र, सध्याच्या सरकारला टंचाई, दुष्काळ, टँकर यांचे काही घेण-देणे नाही, अशी टीकाही त्यांनी केली.

यावेळी महावितरणचे डी. बी. गोसावी, तालुका कृषी अधिकारी कारभारी नवले, सुरेश थोरात, दत्तू कोकणे, अभियंता इंगळे, घुले, यांसह विविध विभागांचे अधिकारी व सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रास्ताविक गटविकास अधिकारी सुरेश शिंदे यांनी, तर नवनाथ आरगडे यांनी सूत्रसंचालन व तहसिलदार साहेबराव सोनवणे यांनी आभार मानले.

दरम्यान, लोकांना पिण्याचे पाणी नसल्याने दुष्काळात नागरिकांचे मोठे हाल होतात. मात्र, अनेक ग्रामसेवक, तलाठी व विविध अधिकारी कामांत विविध कारणे सांगून हलगर्जीपणा करीत असतील, तर अशांवर कडक कारवाई झालीच पाहिजे, असा इशाराही आ. थोरात यांनी दिला.


  •