Sun, Jul 21, 2019 01:27होमपेज › Ahamadnagar › होय, मुलींचा जन्मदर वाढतोय..! 

होय, मुलींचा जन्मदर वाढतोय..! 

Published On: Apr 29 2018 2:10AM | Last Updated: Apr 28 2018 11:10PM- बाळासाहेब मेहेत्रे, अकोले

शासन व प्रशासकीय पातळीवर मुलींची संख्या वाढवण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीने प्रचार आणि प्रसार सुरु असल्याने अकोलेसारख्या आदिवासी तालुक्यातही मुलींची वाढणारी संख्या निश्‍चितच बदलत्या मानसिकतेची ओळख दर्शवणारी आहे. 

अकोले तालुक्यात सुमारे 150 पेक्षा अधिक छोटी-मोठी गावे आहेत. येथील लोकसंख्येच्या तुलनेत त्यांच्यामध्ये मुलींचा जन्मदर वाढवण्याबाबत प्रबोधन करणे जिकरीचे ठरते. अशाही परिस्थितीत राजकीय इच्छाशक्ती आणि आरोग्य विभाग, स्थानिक ग्रामपंचायत आदींच्या सहकार्यातून येथे मुलींचा जन्मदर निश्‍चितच वाढता आहे. 

सन 2013 व 2014 मध्ये अकोलेत दर हजार मुलांच्या जन्मामागे 905 मुली जन्माला आल्या होत्या. 2015 मध्ये अकोलेत वर्षभरात 2243 मुले तर 2080 मुलींचा जन्म झाला होता. त्यामुळे मुलींचे लिंगगुणोत्तर प्रमाण हे 927 पर्यंत्त उंचावले होते. त्यानंतर 2016 मध्ये मुलांचा जन्म 1911 त्यावर्षी मात्र मुलींचा जन्मदर पुन्हा घसरून तो 864 वर आला होता. मात्र त्यानंतर पुन्हा प्रशासकीय यंत्रणा, सामाजिक संस्थांनी याकामी पुढाकार घेवून मोठी जनजागृती केली. शासनाच्या योजनांची माहिती पोहचवली.

त्यामुळे सन 2017 मध्ये पुन्हा एकदा मुलींचा जन्मदर वाढल्याचे आशादायी चित्र समोर आले. गेल्यावर्षी 1560 मुले तर 1473 मुलींचा जन्म झाल्याने मुलींच्या जन्माचे प्रमाण हे दरहजारी मुलांमागे 944 इतके झाले. खरतरं, मागील काही वर्षांच्या तुलनेत मुलींची आकडेवारी ही कमीच आहे. मात्र दरहजारी गुणोत्तर प्रमाण समाधानकारक आहे.  चालू वर्षीच्या 2018 मधील तीन महिन्यांचा आढावा घेतल्यास मुले 1035 आणि मुली 955 जन्माला आल्या आहेत. त्यामुळे चालू वर्षीही मुलींचा जन्मदर 923 असा अपेक्षा वाढवणारा आहे. येणार्‍या काळात दरहजारी मुलांमागे मुलींची संख्याही समान होण्यासाठी प्रशासकीय यंत्रणेबरोबरच सर्वांनी सामाजिक बांधिलकी म्हणून याकामी प्रचार आणि प्रसार करण्याची गरज आहे. त्यातून निश्‍चितच यावर्षी मुलींचा जन्मदर मुलांपेक्षा वाढण्याचे हेच शुभसंकेत समजले जाणार आहेत.