Wed, Apr 24, 2019 00:20होमपेज › Ahamadnagar › जिओ टॅगिंग कामात हलगर्जीपणा नको

जिओ टॅगिंग कामात हलगर्जीपणा नको

Published On: May 16 2018 1:39AM | Last Updated: May 15 2018 10:39PMनगर : प्रतिनिधी

सन 2016-17 मधील जलयुक्त शिवार अभियानाची कामे काही ठिकाणी  पूर्ण होऊनही जिओ टॅगिंग झाले नाही. त्यामुळे राज्य पातळीवर या कामांची  दखल घेतली जात नाही. त्यामुळे जिओ टॅगिंगचे काम तात्काळ पूर्ण करा.मात्र यापुढे अन्य कोणतेही कारण चालणार नाही याची सर्व यंत्रणांनी दखल घ्यावी, असा इशारा जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी दिला.2017-18 मधील उर्वरित कामे देखील 15 जूनपर्यंत पूर्ण करा, असेही त्यांनी स्पष्टपणे बजावले.

जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनाच्या सभागृहात काल (दि.15)  जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्या अध्यक्षतेखाली जलयुक्त शिवार अभियान, मागेल त्याला शेततळे तसेच गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार अभियानाची आढावा बैठक झाली. यावेळी जिल्हा परिषदेचे अतिरिक्‍त मुख्य कार्यकारी अधिकारी  जगन्‍नाथ भोर,  उपजिल्हाधिकारी (रोहयो) वामनराव कदम, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी पंडीत लोणारे, सामाजिक वनीकरण विभागाच्या उपवनसंरक्षक कीर्ति जमदाडे आदींची यावेळी उपस्थिती होती.

या बैठकीत जिल्हाधिकारी द्विवेदी यांनी तालुकानिहाय जलयुक्‍त शिवार अभियानातील विविध यंत्रणांच्या कामांचा आढावा घेतला. कामांचे जिओ टॅगिंग झाल्यानंतरच काम केल्यासंदर्भातील देयके अदा करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. जिओ टँगिगची कामे गांभीर्याने घ्या अन्यथा ती कामांसंदर्भातील अनियमितता मानण्यात येईल, असे त्यांनी नमूद केले. सध्या जलयुक्त शिवार अभियानातील सन 2017-18 मधील कामे पूर्ण करण्यासाठी केवळ दीड महिन्याचा कालावधी शिल्लक आहे. पाऊस सुरु झाल्यानंतर ही कामे पूर्ण करता येणार नाहीत. त्यामुळे सर्व यंत्रणांनी याबाबत कामे या वेळेत पूर्ण करण्याच्या दृष्टीनेच कार्यवाही करा.

याशिवाय सन 2018-19 मध्ये निवडण्यात आलेल्या गावांचे आराखडे तयार करुनही त्याठिकाणी आवश्यक मंजुरी घेऊन कामे सुरु कऱण्यात यावीत, याशिवाय, गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार अभियानांतर्गत ऑनलाईन आलेले अर्ज तसेच ऑफलाईन सादर झालेले अर्ज तात्काळ कार्यवाही करुन निकाली काढण्याची सूचना त्यांनी दिल्या.