होमपेज › Ahamadnagar › सहा तासांच्या चर्चेत ‘विकास’ वेडा

सहा तासांच्या चर्चेत ‘विकास’ वेडा

Published On: Dec 29 2017 1:35AM | Last Updated: Dec 29 2017 12:32AM

बुकमार्क करा
श्रीरामपूर : प्रतिनिधी

नगरपालिकेची सर्वसाधारण सभा काल तब्बल सहा तास चालली. परंतु बैठकीत विकासाकामांऐवजी जादावेळ एकामेकांची वैयक्तीक उणेटुणे काढण्यात गेली.  त्यामुळे सभागृहाचा अनमोल वेळ वाया गेला. विकासकामांवर चर्चा होण्यासाठी आता पुढील सभेची वाट नागरिकांना पहावी लागणार आहे. दरम्यान विकास न होण्याचे खापर अधिकार्‍यांवर फोडत सर्वच नगरसेवक मोकळे झाले. पालिकेच्या सर्वसाधारण सभा काल पिठासीन अधिकारी तथा नगराध्यक्षा अनुराधा आदिक यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. व्यासपीठावर उपनगराध्यक्ष करण ससाणे उपस्थित होते. 

नगरसेवक संतोष कांबळे यांनी पालिकेतील अधिकार्‍यांच्या नाकर्तेपणामुळे शहरास रमाई आवास घरकुल योजनेसाठीचा आलेला 40 लाखांचा निधी राहाता नगरपालिकेला गेल्याचे निदर्शनास आणून दिले. यावर पालिकेच्या अधिकार्‍यांनी स्पष्टीकरण देताना सांगितले, रमाई आवास योजनेअंतर्गत 4 कोटींचा निधी मंजूर झालेला होता. त्यासाठी 359 अर्ज आले होते. यापैकी 176 अर्ज मंजूर करण्यात आले. पैकी 28 घरकुले पूर्ण झाली तर 145 घरकुलांचे काम सुरु असल्याचे सांगितले.

मात्र, गोरगरीबांसाठी घर बांधण्यासाठी हा निधी येऊनही त्यापैकी 40 लाख रुपये निधी परत राहाता नगरपालिकेला गेला. याला सर्वस्वी बांधकाम अधिकारी जबाबदार आहे, असा आरोप कांबळे यांनी केला. लाभार्थींकडून कागदपत्रांची पुर्तता नव्हती. तसेच लोकांकडून प्रतिसाद कमी मिळाला, असे बांधकाम खात्याचे गवळी यांनी उत्तर दिले. यावर कांबळे, नगरसेवक प्रकाश ढोकणे यांनी त्यांना धारेवर धरले. तसेच गवळी यांच्या कामात सुधारणा न झाल्यास  जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाचा इशारा दिला.

सभा सुरु होताच उपनगराध्यक्ष करण ससाणे आणि श्रीनिवास बिहाणी यांनी डेली ठेक्याचा विषय उपस्थित करत पहिल्या दोन ठेकेदारांवर गुन्हा का दाखल केला नाही ? त्यांच्याकडे पैसे का वसूल केले नाही ? असा सवाल केला. त्यावर सदर ठेकेदारांवर कोर्टात दावा केल्याचे पालिकेच्या वतीने सांगण्यात आले. मध्यंतरी ठेका दिलेला नसताना 4 महिन्यात 12 लाख रुपये वसूल झाल्याचे पालिकेच्यावतीने सांगण्यात आले. पालिकेच्या झालेल्या या तोट्यास कोण जबाबदार? असा सवाल ससाणे यांनी उपस्थित केला. 

पालिकेत अधिकारी उपस्थित नसतात. पालिकेच्या योजनांची माहिती अधिकारी जनतेला देत नसल्याचा आरोप राजेंद्र पवार यांनी केला. यावेळी सीसीटीव्ही कॅमेरा देणार्‍या व्यक्तीची जाहिरात त्यावर असेल तर त्यासाठी कर आकारु नये, अशी मागणी करण्यात आली. चर्चेत शामलिंग शिंदे, राजेश अलघ, किरण लुणिया, दीपक चव्हाण, रवी पाटील, चंद्रकला डोळस आदींनी भाग घेतला.

म्हाडा येथील पोलिसांच्या सदनिकास पालिकेने दिलेल्या 2 इंची नळास कनेक्शन देण्याबद्दल काल चर्चा झाली. या सदनिकेला जर 2 इंची कनेक्शन दिले तर उद्या कोणीही खासगी व्यक्ती तसे कनेक्शन मागेल. सदर सदनिकांना कनेक्शन द्यायचे असेल तर 78 सदनिकांना अर्धा इंची डिपॉझिट भरुन स्वतंत्र कनेक्शन देण्याबाबत चर्चा झाली. सर्वांनीच यास आक्षेप घेतल्याने कालच्या मिटींगमध्ये पोलिसांना पाणी देण्यावरचा विषय स्थगित केला.

ससाणे आमचे नेतेः शेख

सध्या ‘वेस्टन हाईट्स व गोल्ड मार्गेट’चा विषय सध्या गाजत आहे. यावरून अतिक्रमणाचा विषय निघाला. यावेळी अंजुम शेख, श्रीनिवास बिहाणी, किरण लुणिया, दीपक चव्हाण आदींनी या विषयावर जोरदार चर्चा सुरु केली. यावेळी संतापलेले शेख म्हणाले, माझे जे प्लॉट आहे हे ऑनपेपर आहेत. दोन नंबरचे काही नाही, तो माझा व्यवसाय आहे. मी टॅक्स भरतो. मात्र, काही लोक दुसर्‍याच्या खांद्यावर बंदुक ठेवून वागत आहेत. परंतु आमचे नेते ससाणेंनी आम्हाला कुणाला कसं अ‍ॅडजेस्ट करायचे, शांत रहायचे हे शिकवलं असल्याचे सांगितल्याने सभागृहातील सर्वांच्याच भुवया उंचावल्या.