Fri, Apr 26, 2019 09:23होमपेज › Ahamadnagar › लोकसहभागातून कचरामुक्त शहर संकल्प

लोकसहभागातून कचरामुक्त शहर संकल्प

Published On: Jan 22 2018 1:26AM | Last Updated: Jan 21 2018 10:49PMनगर : प्रतिनिधी

सर्वपक्षीय नगरसेवकांनी पुढाकार घेऊन आपापल्या प्रभागात स्वच्छता अभियान राबवून, लोकसहभागातून कचरामुक्त शहर करण्याचा संकल्प करावा, असे प्रतिपादन महापौर सुरेखा कदम यांनी केले.

स्वच्छ भारत अभियानांतर्गत प्रभाग 27 मध्ये प्रभाग स्वच्छता स्पर्धेनिमित्त नगरसेवक अनिल शिंदे यांच्या पुढाकारातून प्रभागात दोन दिवस स्वच्छता अभियान राबविण्यात आले. यावेळी महापौर कदम बोलत होत्या. स्थायी समिती सभापती सुवर्णा जाधव, ज्येष्ठ नागरिक मंचचे अध्यक्ष के. डी. खानदेशी यांच्यासह नागरिक यावेळी उपस्थित होते. 

महापौर कदम म्हणाल्या की, केंद्र शासन व राज्य शासनाने स्वच्छता अभियान सक्षमपणे व्हावे, यासाठी स्वच्छ प्रभाग अभियान सुरू केले आहे. यासाठी पहिले पारितोषिक 30 लाख रुपये, द्वितीय 20 लाख रुपये व तिसरे पारितोषिक 15 लाख रुपये दिले जाणार आहे. मनपाकडून स्वच्छ अ‍ॅप डाऊनलोड सुरू करण्यात आले आहे. त्यावर नागरिकांनी स्वच्छतेच्या तक्रारी कळवाव्यात. त्या लगेच सोडविण्यात येतील.  

सभापती जाधव म्हणाल्या की, नागरिकांनी रस्त्यावर कचरा टाकू नये. स्वच्छता अभियान यशस्वी करण्यासाठी लोकसहभागाची गरज आहे. अनिल शिंदे म्हणाले की, नागरिकांना ओला व सुक्या कचर्‍याचे वर्गीकरण करून, तो कचरा गाडीमध्येच टाकला पाहिजे. प्रभाग कुंडीमुक्त करण्यासाठी प्रयत्न चालू असल्याचेही त्यांनी सांगितले.