Mon, Mar 25, 2019 03:18
    ब्रेकिंग    होमपेज › Ahamadnagar › कचराकोंडीने पेटला राजकीय वाद!

कचराकोंडीने पेटला राजकीय वाद!

Published On: Mar 22 2018 1:38AM | Last Updated: Mar 22 2018 1:38AMनगर : प्रतिनिधी

सावेडी येथील कचरा डेपोच्या जागेची निवड, तेथील कचरा डेपोला मंजुरी व त्यानंतर या डेपोत खतनिर्मिती प्रकल्पासह विविध कामे याला राष्ट्रवादी काँग्रेसच्या सत्ताकाळातच मंजुरी देण्यात आलेली आहे. त्या कामांच्या ठरावांना नगरसेवक कुमार वाकळे व संपत बारस्कर हेच सूचक-अनुमोदक आहेत. आता नागरिकांची दिशाभूल करुन आंदोलनाची स्टंटबाजी केली जात आहे. संपूर्ण शहराला व नगरकरांना वेठीस धरले जात आहे. कचरा न उचलला गेल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आल्यास याला ‘राष्ट्रवादी’च जबाबदार राहील, अशा शब्दांत शिवसेनेने ‘राष्ट्रवादी’वर टीकास्त्र सोडले आहे. या प्रकरणी अप्पर पोलिस अधिक्षकांची भेट घेवून आंदोलकांवर गुन्हे दाखल करण्याची मागणीही शिवसेनेने केली आहे.

सावेडी कचरा डेपो इतरत्र हलविण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या संपत बारस्कर, कुमार वाकळे यांनी आंदोलन छेडले आहे. गेल्या तीन दिवसांपासून शहरात कचराकोंडी झाली आहे. कचरा उचलण्याचे कामही ठप्प झाले आहे. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता असून याला राष्ट्रवादीच जबाबदार राहील, असा इशारा महापौर सुरेखा कदम यांनी पत्रकार परिषदेत दिला आहे. बुरुडगाव येथील कचरा डेपोची निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. 8 दिवसांत ही प्रक्रिया मार्गी लागेल व डेपो सुरु होईल. त्यानंतर सावेडी कचरा डेपोचा लोडही कमी होईल. सावेडी कचरा डेपो येथे साचलेल्या अविघटनशील कचर्‍याची विल्हेवाट लावण्याचे आदेश दिले आहेत. तेथील लण्डफिल साईटच्या वापराची मंजुरीही देण्यात आली आहे. त्यामुळे साचलेल्या कचर्‍याचा प्रश्‍न मार्गी लागेल. ज्यांनी हा कचरा डेपो सावेडीवर लादण्याचा निर्णय घेतला त्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांनीच आंदोलनाची स्टंटबाजी करुन संपूर्ण नगरला वेठीस धरले आहे. कचरा डेपो स्वतःच लादायलचा आणि आता आंदोलनाची नौटंकी करुन सगळ्या नगरकरांना वेठीस धरायचे काम राष्ट्रवादी काँग्रेसने केले आहे. त्यामुळे जनताच त्यांना आता धडा शिकवेल, असा टोला त्यांनी लगावला.

दरम्यान, महापौरांसह उपमहापौर अनिल बोरुडे, सभागृह नेते गणेश कवडे, शहरप्रमुख दिलीप सातपुते, माजी महापौर भगवान फुलसौंदर, दीपक खैरे, दिगंबर ढवण यांनी अप्पर पोलिस अधीक्षक घनश्याम पाटील यांची भेट घेवून आंदोलकांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली. पाटील यांनीही कचराकोंडीचे गांभीर्य लक्षात घेवून आंदोलकांना नोटीसा बजावून पोलिस बंदोबस्तात कचरा गाड्या रवाना करण्याच्या सूचना तोफखाना पोलिसांना दिल्या आहेत.