Tue, Apr 23, 2019 20:12होमपेज › Ahamadnagar › बंदोबस्ताने फुटली कचराकोंडी!

बंदोबस्ताने फुटली कचराकोंडी!

Published On: Mar 23 2018 1:56AM | Last Updated: Mar 22 2018 11:18PMनगर : प्रतिनिधी

कचरा डेपो इतरत्र हलविण्याच्या मागणीसाठी सावेडी कचरा डेपोत कचरा टाकण्यास मनाई करत राष्ट्रवादी काँग्रेसने गाड्या अडविल्यामुळे शहरात कचराकोंडी निर्माण झाली होती. मनपा प्रशासन व पदाधिकार्‍यांनी पोलिस प्रशासनाकडून बंदोबस्त मागवत ही कचराकोंडी फोडली आहे. बुधवारी (दि.21) रात्रीपासूनच डेपोत गाड्या रिकाम्या करण्यास सुरुवात झाली आहे.

नगरसेवक संपत बारस्कर, कुमार वाकळे आदींसह स्थानिक नागरिकांनी कचरा डेपो इतरत्र हलविण्याची मागणी करत सावेडी कचरा डेपोत कचरा टाकण्यास मनाई केली होती. गेल्या तीन दिवसांपासून गाड्या अडविण्याचे आंदोलन सुरु होते. आधीच बुरुडगाव कचरा डेपोतील खतनिर्मिती प्रकल्प बंद असल्याने संपूर्ण शहराचा कचरा याच डेपोत टाकला जात आहे. त्यामुळे गेल्या तीन दिवसांपासून कचरा भरलेल्या गाड्या जागेवरच होत्या. परिणामी, शहरातील कचरा संकलनही ठप्प झाले होते. मनपा आयुक्‍तांसह महापौर सुरेखा कदम व पदाधिकार्‍यांनी बुधवारी (दि.21) पोलिस प्रशासनाचे याकडे लक्ष वेधत बंदोबस्त देण्याची मागणी केली होती. तसेच आंदोलनकर्त्यांवर प्रतिबंधात्मक कारवाईचीही मागणी करण्यात आली होती.

त्यानंतर सायंकाळी तोफखाना पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सुरेश सपकाळे यांनी बारस्कर यांच्यासह आंदोलनकर्त्यांना नोटीसा बजावून कचरा डेपोच्या परिसरात गाड्या अडविण्यास मनाई करत प्रतिबंधात्मक कारवाई केली. शहरात मोठ्या प्रमाणात कचरा साचला असून नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. कचरा संकलन होत नसल्याने इतर संघटनांनीही आंदोलनाचा इशारा दिला आहे. त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होऊ शकतो. त्यामुळे या परिसरात फिरकू नये, अशी तंबी पोलिसांनी दिली होती. रात्री 11.30 वाजता पोलिस बंदोबस्त उपलब्ध झाल्यानंतर तीन दिवसांपासून कचरा भरलेल्या गाड्या डेपोकडे रवाना करण्यात आल्या. काल (दि.22) सकाळपर्यंत 32 गाड्या डेपोत रिकाम्या करण्यात आल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर आंदोलनकर्त्यांनीही काहीशी नरमाईची भूमिका घेतल्यामुळे शहरातील ‘कचराकोंडी’ची समस्या सुटल्याचे चित्र आहे. दरम्यान, कचरा डेपो इतरत्र हलविण्यासाठी लोकशाही मार्गाने आमचे आंदोलन सुरुच राहील, असे संपत बारस्कर यांनी स्पष्ट केले आहे.

Tags : Ahamanagar, Garbage Depot issue, Ahamanagar new