Sun, Oct 20, 2019 01:09होमपेज › Ahamadnagar › चिमुकल्याच्या मदतीसाठी सरसावले अनेक हात!

चिमुकल्याच्या मदतीसाठी सरसावले अनेक हात!

Published On: Jan 15 2018 1:40AM | Last Updated: Jan 14 2018 10:42PM

बुकमार्क करा
नगर : प्रतिनिधी

यकृत (लिव्हर) च्या बिघाडाने त्रस्त असलेल्या गणेशची उपचाराअभावी होणारी परवड थांबणार आहे. त्याच्या उपचारासाठी अनेकांनी मदतीचे हात पुढे केले आहेत. कामरगाव ग्रामस्थांसह श्रीगोंदा येथील अग्निपंख फाउंडेशनने मिळून 50 हजारांची आर्थिक मदत दिली आहे. अनुलोम संस्थेने गणेशच्या उपचाराची संपूर्ण जबाबदारी उचलत त्याला पुणे येथील पंडित दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे चिमुकल्या गणेशची होणारी परवड आता थांबणार आहे. या मदतीमुळे पवार कुटुंबीय भारावून गेले आहे.

कामरगाव (ता.नगर) येथील रामदास व काजल पवार हे भटक्या समाजातील दाम्पत्य शेती औजारे तयार करून उदरनिर्वाह भागविते. उघड्या जागेवरच पाल ठोकून त्यांनी निवारा केला आहे. अडीच वर्षांचा एकुलता मुलगा गणेश याचे  लिव्हर बिघडले असून, पोट दिवसागणिक फुगत चालले आहे. डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला दिला असून, त्यासाठी 2 लाखांहून अधिक खर्च सांगितला आहे. एवढी रक्कम कोठून आणावी ? हा प्रश्‍न त्यांना सतावत होता. याबाबत ‘पुढारी’त ‘झोपडीतील चिमुकला सोसतोय नरकयातना’ असे वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर गणेशवर उपचारासाठी अर्थसाह्य करण्यासाठी अनेक हात पुढे सरसावले आहेत.  

‘पुढारी’ त वृत्त प्रसिद्ध होताच सामाजिक कार्यकर्ते तुकाराम कातोरे यांनी गावात मदत फेरी काढली. यातून 25 हजार रुपये जमा झाले. श्रीगोंदा येथील अग्निपंख फाउंडेशनच्या पदाधिकार्‍यांनी रविवारी(दि.14)कामरगावमध्ये गणेशच्या उपचारासाठी त्याच्या आई-वडिलांकडे 21 हजारांच्या मदतीचा धनादेश दिला. यावेळी अध्यक्ष बाळासाहेब काकडे, उपाध्यक्ष प्रा.संजय लाकूडझोडे, नगरसेवक सुनील वाळके, पं.स.सदस्य अतुल लोखंडे, बाबूशेठ राक्षे, ‘पुढारी’चे उपसंपादक मुरलीधर तांबडे, तालुका प्रतिनिधी अमोल गव्हाणे, दत्ता पाचपुते, सरपंच गणेश साठे, उपसरपंच अनिल आंधळे, वसंत ठोकळ, तुकाराम कातोरे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

अनुलोम या सामाजिक संस्थेचे दीपक ददीयाल, सागर मैड, महेश मासाळ यांनी गणेशच्या उपचाराचा भार उचलला आहे. पुण्यातील पं.दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात गणेशला उपचारासाठी रात्री उशिरा नेण्यात आले. याठिकाणी त्याच्यावर उपचार होणार असून, उपचाराचा सर्व खर्च त्यांनी उचलला आहे. याशिवाय अन्य काही मदत लागल्यास अग्निपंख फाउंडेशसह सुप्यातील दत्ता पवार,संभाजी पवार यांनी देण्याची तयारी दर्शविली आहे. गणेशवर उपचार होणार असून, त्याची या त्रासातून सुटका होणार आहे.