Wed, Nov 21, 2018 01:07होमपेज › Ahamadnagar › छिंदम, भिडेंना विरोधामुळेच हल्ला! : जितेंद्र आव्हाड 

छिंदम, भिडेंना विरोधामुळेच हल्ला! : जितेंद्र आव्हाड 

Published On: Jul 02 2018 1:41AM | Last Updated: Jul 01 2018 10:42PMनगर : प्रतिनिधी

शिवद्रोही छिंदमच्या विरोधात घेतलेली भूमिका, संभाजी भिडेंच्या विचाराविरोधातील लढा व छिंदम-मुदगल यांचे संबंध यातूनच अ‍ॅड. गजेंद्र दांगट यांच्यावर प्राणघातक हल्ला झाल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आ. जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. पुरोगामी विचारांवर हल्ला होत असतांना कोतवालीचे पोलिस निरीक्षक राजकीय दबावातून आरोपीला सोडून देतात. त्यामुळे भिडेंचे ‘धारकरी’ असलेल्या रत्नपारखींना तात्काळ हटवावे, अशी मागणीही त्यांनी पत्रकारांशी बोलतांना केली.

छत्रपती प्रतिष्ठानचे संस्थापक अ‍ॅड. दांगट यांच्यावर शनिवारी (दि.30) प्राणघातक हल्ला झाला. आ. आव्हाड यांनी काल (दि.1) नगर येथे येवून दांगट यांच्यावर सुरु असलेल्या उपचाराची माहिती घेत त्यांच्या कुटुंबियांची भेट घेतली. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. आ. आव्हाड म्हणाले की, अ‍ॅड. दांगट पुरोगामी चळवळीतील कार्यकर्ता आहे. संभाजी भिडेंच्या विरोधात विचारांची लढाई तो लढत होता. शिवद्रोही छिंदमवर कारवाईच्या मागणीसाठी त्याने मोर्चा काढला होता. त्याच वेळी छिंदमशी आर्थिक संबंध असलेल्या मुदगल यांनी दांगट यांना अडविण्याचा प्रयत्न केला होता.

छिंदम प्रकरण व भिडेंविरोधातील वैचारीक लढ्यामुळे तो त्यांच्या समर्थकांच्या ‘टार्गेट’वरच होता. त्यातूनच हा हल्ला झाला. पोलिसांनी मात्र याकडे दुर्लक्ष केले. या उलट भिडे समर्थकांनी दांगटच्या घरावर जाऊन धिंगाणा घातल्यानंतर दांगट यांच्याच भावावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. दुसरीकडे आज गजेंद्र दांगट स्वतः मृत्यूशी झुंज देत असतांना त्याच्यावर हल्ला करणार्‍या मुदगलला पोलिसांनी सोडून दिले. कोतवाली पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक रत्नपारखी पूर्णपणे राजकीय दबावाखाली काम करत आहेत. पोलिस अधीक्षक रंजन शर्मा यांनी त्यांना तात्काळ हटवावे. येत्या 24 तासांत आरोपींना अटक करावी, अशी मागणी त्यांनी केली.

या प्रकरणी पोलिस अधीक्षकांशी संपर्क साधला. मात्र, त्यांनी फोन घेतला नाही. अधिकार्‍यांकडे ज्या वेळेस उत्तर नसते, तेव्हा ते असे टाळतात, असा टोला लगावत विधीमंडळात या घटनेप्रकरणी आवाज उठविणार असल्याचे ते म्हणाले. यावेळी माजी महापौर अभिषेक कळमकर, कुमार वाकळे, माणिकराव विधाते, संपत बारस्कर, अभिजित खोसे आदी उपस्थित होते.