Tue, Apr 23, 2019 23:34होमपेज › Ahamadnagar › हल्ल्यामागे छिंदम, भिडे गुरुजींचा हात!

दांगट कुटुंबियांचा आरोप; पोलिस अधीक्षकांना दिले निवेदन

Published On: Jul 03 2018 1:50AM | Last Updated: Jul 02 2018 11:46PMनगर : प्रतिनिधी

राष्ट्रवादी युवकचे सरचिटणीस अ‍ॅड. गजेंद्र दांगट यांच्यावर प्राणघातक हल्ला करणार्‍यांविरुद्ध कठोर कारवाई करण्यात यावी. तसेच या हल्ल्यामागे श्रीपाद छिंदम व भिडे गुरुजी यांचा हात असल्याचा आरोप दांगट कुटुंबियांनी काल (दि. 2) पोलिस अधीक्षक रंजन कुमार शर्मा यांना दिलेल्या निवेदनात केला आहे.

याप्रसंगी जखमी अ‍ॅड. दांगट यांची आई सरला दांगट, पत्नी नीलिमा दांगट, शौर्य दांगट, अर्चना अनभुले, उदय अनभुले, संगिता चक्के, मंगल रोहकले, उज्वला लाटे, शिल्पा लाट आदी उपस्थित होते. याबाबत दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, छिंदम याने छत्रपती शिवरायांबाबत  केलेल्या वक्तव्याच्या निषेध करणार्‍यांमध्ये अ‍ॅड. गजेंद्र दांगट हे आघाडीवर होते. त्यामुळे दांगट यांच्यावर छिंदम टोळीचा राग होता. त्यामुळे पाळत ठेवून पूर्वनियोजित पध्दतीने कट रचून देविदास मुदगल व त्यांच्या साथीदारांनी दांगट यांना जिवे मारण्याचा प्रयत्न केला आहे. या हल्ल्यामागे श्रीपाद छिंदम आणि शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संघटनेचे भिडे गुरूजी यांचा हात असल्याचे प्रथमदर्शनी दिसून येते. हल्लेखोर देविदास मुदगल हा भिडे गुरूजीच्या संघटनेचा अहमदनगर शहराध्यक्ष आहे.

हल्ल्याचे सूत्रधार श्रीपाद छिंदम व भिडे गुरुजी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात येऊन कडक कायदेशीर कारवाई करण्यात यावी, दांगट यांच्यावर मुदगल यांच्या टोळीमार्फत नोंदविण्यात आलेला खोटा गुन्हा तात्काळ मागे घेण्यात यावा, दांगट परिवाराला पोलिस संरक्षण देण्यात यावे, पोलिस निरीक्षक रत्नपारखी यांची चौकशी करुन तपास ‘सीआयडी’कडे देण्यात यावा आदी मागण्या करण्यात आल्या आहेत.