Mon, Jun 17, 2019 18:16होमपेज › Ahamadnagar › गायकवाड यास ७ दिवस पोलिस कोठडी

गायकवाड यास ७ दिवस पोलिस कोठडी

Published On: May 05 2018 12:47AM | Last Updated: May 04 2018 11:45PMजामखेड : प्रतिनिधी

येथील योगेश राळेभात व राकेश राळेभात यांच्या हत्येप्रकरणातील मुख्य आरोपी स्वामी उर्फ गोविंद दत्ता गायकवाड (वय 20) यास जामखेड येथील न्यायालयात हजर केले असता त्यास सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली.

या घटनेतील मुख्य आरोपी स्वामी उर्फ गोविंद दत्ता गायकवाड (रा. तेलंगशी ता. जामखेड, हल्ली शिवशंकर तालीम जामखेड) यास स्थानिक गुन्हे शाखा, सायबर शाखा व जामखेड पोलिस यांनी मांडवगण फाटा(ता. शिरूर, जि. पुणे) येथे बुधवारी मध्यरात्री ताब्यात घेतले. तसेच त्याच्याबरोबर एका अल्पवयीन मुलास देखील ताब्यात घेतले. त्यानंतर 4 मे रोजी दुपारी दोन वाजता जामखेड येथील न्यायाधीश ए. एम. मुजावर यांच्या न्यायालयात आरोपीला हजर करण्यात आले. तपासी अधिकारी व सरकारी वकील रमाकांत भोकरे यांनी न्यायालयात युक्तिवाद करताना सांगितले की, आरोपीने गुन्ह्यात वापरलेले दोन पिस्तूल व मोटारसायकल हस्तगत करणे बाकी आहे. पिस्तूल व गोळ्या कोठून आणल्या, दुहेरी हत्याकांड हा गुन्हा गंभीर स्वरूपाचा आहे. त्यामुळे या गुन्ह्याच्या तपास करणे कामी चौदा दिवसांची पोलिस कोठडी देण्यात यावी, अशी मागणी केली. यावर न्यायालयाने सात दिवसांची (10 मे) पर्यंत पोलिस कोठडी देण्यात आली आहे. 

आरोपी गायकवाड यास दुपारी दीड वाजता जामखेड येथे आणण्यात आले. यावेळी न्यायालय परिसरात मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. सर्व रस्ते काही वेळ बंद करण्यात आले होते. तपासी अधिकारी पोलिस उपअधीक्षक सुदर्शन मुंडे हे हजर होते.