Sun, May 31, 2020 05:33होमपेज › Ahamadnagar › गहिनीनाथगड दिंडीचे पंढरीकडे प्रस्थान

गहिनीनाथगड दिंडीचे पंढरीकडे प्रस्थान

Published On: Jul 14 2018 12:48AM | Last Updated: Jul 13 2018 10:46PMजामखेड : प्रतिनिधी

संत वामनभाऊ महाराज यांच्या श्री क्षेत्र गहिनीनाथगड ते पंढरपूर पालखीचे काल मोठ्या उत्साहात प्रस्थान झाले. या दिंडीचे पहिले रिंगण जमादारवाडी, जामखेड येथील संत वामनभाऊ महाराज यांच्या मंदिर परिसरात शनिवारी दुपारी 3 वा. होणार आहे.श्रीक्षेत्र गहिनीनाथ गडाचे मठाधिपती हभप विठ्ठल महराज यांच्या मार्गदर्शनाखाली गुरुवारी (दि.12) श्रीक्षेत्र गहिनीनाथगड येथून संत वामनभाऊ महाराज यांची पालखी पंढरपूरकडे मार्गस्थ झाली. सुमारे पंचवीस हजार वारकरी यात सहभागी झाले आहेत.

नगर व बीड जिल्हाच्या सीमेवर असणारे श्रीक्षेत्र गहिनीनाथगड हे संत वामनभाऊंचे समाधीस्थान आहे. महाराष्ट्रातील कानाकोपर्‍यात भाऊंचे लाखो भक्त आहेत. संत वामनभाऊ महाराज यांनी स्वतःआषाढी वारीची परंपरा सुरू केली होती. तेव्हापासून आजतागायत ही परंपरा चालूच आहे. या दिंडीला अनन्यसाधारण महत्व आहे. राज्यभरातून सुमारे 25 हजारांहून अधिक वारकरी या दिंडीत सहभागी होत असतात.  दरवर्षी वारकर्‍यांचा सहभाग वाढतच आहे.

गहिनीनाथगड, निवडुंगा, वाहली, सावरगाव, केकानवस्ती, वनवेवाडी, मातकुळी असा प्रवास करत  शनिवारी सकाळी जांबवाडी, जामखेड जगदाळेवस्ती मार्गे दिंडी जमादारवाडी जामखेड येथील संत वामनभाऊ गड परिसरात दुपारी 3 वाजे दरम्यान  दाखल होईल. याच ठिकाणी पहिले गोल रिंगण होईल. त्यानंतर जमादारवाडी येथे भोजन करून सारोळा येथे ही दिंडी मुक्कामी पोहचेल.या भागातून पंढरपूरला जाणारी ही सर्वात मोठी दिंडी आहे. चार वर्षांपासून या एकमेव दिंडीचे येथे रिंगण होते. त्यामुळे या परिसरातील भक्तगणांसाठी ही पर्वणीच ठरते. या रिंगण सोहळयाचा तालुक्यातील भक्तांनी लाभ घ्यावा, असे अवाहन वामनभाऊ भक्त मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.