होमपेज › Ahamadnagar › गडाख-घुले यांचे होणार मनोमिलन!

गडाख-घुले यांचे होणार मनोमिलन!

Published On: Mar 13 2018 1:40AM | Last Updated: Mar 13 2018 1:40AMशेवगाव : रमेश चौधरी

माजी आमदार शंकरराव गडाख यांनी आक्रमक भूमिका घेत आपल्या विधानसभा निवडणुकीतील पराजयाचे खापर घुले बंधूंवर फोडत राष्ट्रवादीतून बाहेर पडून क्रांतीकारी शेतकरी पक्षाची स्थापना केल्यानंतर माजी खासदार तुकाराम गडाख आणि घुले बंधूंचे राजकीय मनोमिलन होण्याचे संकेत नुकतेच मिळाले आहेत. 

माजी खा. तुकाराम गडाख पुन्हा राष्ट्रवादीत य ेण्यास इच्छुक असून काही कार्यकर्त्यांच्या मध्यस्थीने या संदर्भात औपचारिक बैठकही होणार होती. मात्र काही कारणास्तव ती लांबणीवर पडली आहे. बैठकीनंतर व श्रेष्ठीच्या होकाराने यावर निर्णय घेतला जाणार आहे. नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार तथा नेवासा शेवगाव विधानसभा मतदार संघाचे माजी आमदार तुकाराम गडाख  राजकारणापासून काहीसे अलिप्त रहात होते. मात्र लोकसभा अथवा विधानसभा निवडणुकीदरम्यान त्यांचे राजकारण जागृत होत असे. सन 1990 साली अपक्ष उमेदवार म्हणून शेवगाव-नेवासा मतदार संघातून ते आमदार झाले. त्यानंतरच्या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. परंतु भविष्यात त्यांची अडचण येऊ नये या हेतुने घुले बंधूंनी गडाख यांना राष्ट्रवादीत घेण्याचा यशस्वी प्रयत्न केला. त्यांना राष्ट्रवादीने दक्षिण लोकसभा निवडणुकीची उमेदवारी दिली. यात गडाख विजयी होऊन खासदार झाले.

खासदारकीच्या कार्यकाळात तुकाराम गडाख यांचे राष्ट्रवादी श्रेष्ठींशी काही कारणावरुन सतत मतभेद होत गेले. तसेच प्रकृती अस्वास्थ्यामुळे तुकाराम गडाख गेल्या तब्बल एक तपापासून राजकीय अज्ञातवासात गेले होते. राष्ट्रवादीशी खटकल्यानंतर त्यांनी बसपापक्षाकडून उमेदवारी केली. मात्र त्यांना पराभव पत्कारावा लागला. त्यानंतर ते प्रत्येक निवडणुकीत अलिप्त रहात गेल्याने त्यांचा राजकीय प्रवास थंड झाला. दरम्यानच्या काळात जनसंपर्कही मोठ्या प्रमाणात कमी झाल्याने कार्यकर्ते इतरत्र विखुरले गेले. तरीही निवडणूक आली की तेवढ्यापुरते त्यांचे राजकारण जागृत होत होते आणि पुन्हा विरत होते. 

आता लोकसभा निवडणुका जवळ आल्या आहेत. त्या दृष्टीणे सर्वच राजकीय पक्षांत खलबते सुरु झाली आहेत. या निमित्ताने तुकाराम गडाख पुन्हा राजकारणात सक्रिय होणार असल्याची चर्चा सुरु झाली आहे. मात्र पक्ष कोणता हे अनिश्चित आहे. तरीही आपण राष्ट्रवादीत येण्यास इच्छुक असल्याची चर्चा त्यांनी घुले यांच्या काही निष्ठावान कार्यकर्त्यांजवळ प्रदर्शित केली. हा संदेशही राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर घुले यांच्या पर्यंत गेला. या संदर्भात तुकाराम गडाख व चंद्रशेखर घुले यांची रविवारी औपचारिक बैठकही होणार होती. मात्र काही कारणास्तव ती पुढे ढकलण्यात आल्याची खात्रीलायक माहिती आहे.

विधानसभा निवडणुकीतील पराभव घुले यांच्या चांगलाच जिव्हारी लागला आहे. आता एक, एक मत महत्वाचे आहे. त्यामुळे त्यांचे बेरजेचे राजकारण सुरु झाले आहे. माजी खा. गडाख यांना शेवगाव व नेवासा तालुक्यात मानणारे कार्यकर्ते आजही आहेत. ते राष्ट्रवादीत परतल्यास शेवगाव तालुक्यात आगामी निवडणुकीत घुले यांना मतांचा हातभार लागणार आहे. नेवासा मतदारसंघात राष्ट्रवादीला उमेदवार मिळणार आहे. एका दगडात अनेक पक्षी मारण्याची संधी येणार असल्याने घुले बंधू तुकाराम गडाख यांना स्वगृही घेण्यास इच्छुक असून या बाबत पक्षश्रेष्ठींचे मन वळविण्यासाठी प्रयत्न होणार आहेत. त्यामुळे गडाख-घुले यांचे राजकीय मनोमिलन होण्याचे संकेत मिळत आहेत.