Thu, Aug 22, 2019 10:13होमपेज › Ahamadnagar › ‘जीएसटी’पोटी मनपाला ‘फुटाणा

‘जीएसटी’पोटी मनपाला ‘फुटाणा

Published On: Mar 06 2018 1:52AM | Last Updated: Mar 05 2018 11:48PMनगर : प्रतिनिधी

जीएसटीपोटी महापालिकांना दरमहा दिल्या जाणार्‍या अनुदानाचे वितरण करण्याचे आदेश काल (दि.5) नगरविकास विभागाने दिले आहेत. मात्र, यात मार्च महिन्याच्या 7.12 कोटींच्या अनुदानापैकी नगर महापालिकेला अवघे 3 लाख रुपयेच मंजूर झाल्यामुळे अधिकारी वर्तुळात खळबळ उडाली आहे. दरम्यान, वाढीव अनुदान न मिळाल्यास कर्मचार्‍यांचे पगार, पेन्शन व मानधन रखडण्याची चिन्हे आहेत.
एलबीटीपोटी मनपाला 5.44 कोटींची नुकसान भरपाई दरमहा अनुदानाच्या स्वरुपात मिळत होती. जीएसटी लागू झाल्यापासून मनपाला दरमहा 7.12 कोटी अनुदान स्वरुपात दिले जात आहेत. यातून मनपाच्या 2 हजार कर्मचार्‍यांचे पगार केले जातात.

निव्वळ याच अनुदानामुळे गेल्या वर्षभरापासून कर्मचार्‍यांचे पगार नियमित होत आहेत. शासनाने काल मार्च महिन्याचे अनुदान मंजूर केले असून यात 7.12 कोटींऐवजी केवळ 3 लाख रुपयेच मंजूर करण्यात आले आहेत. तब्बल 7.09 कोटींची कपात केल्यामुळे ऐन मार्च अखेरीच्या तोंडावर मनपाची आर्थिक कोंडी झाली आहे. सरकारने केलेल्या कपातीबाबत प्रशासन अनभिज्ञ असून मनपाकडून येणे असलेली कर स्वरुपातील थकीत देणी शासनाने कपात करुन वसूल केल्याचे सांगण्यात येत आहे

. मात्र, आर्थिक वर्षाखेरीस जवळपास संपूर्ण अनुदान कपात झाल्यामुळे कर्मचार्‍यांचे पगार, पेन्शन रखडून रखडण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. ठप्प असलेल्या वसुलीमुळे आधीच मनपा आर्थिक अडचणीत आहे. महावितरणने कारवाईचा बडगा उगारुन येत्या काही दिवसांत 7 कोटी भरण्याची तंबी दिली आहे. अशा स्थितीत शासनानेही कोंडी करत महापालिकेला आर्थिक खाईत ढकलल्याचे चित्र आहे. दरम्यान, अनुदना कपातीमुळे मनपाच्या कर्मचार्‍यांत चिंतेचे वातावरण आहे.