Sun, Jul 21, 2019 16:57
    ब्रेकिंग    होमपेज › Ahamadnagar › जीएसटी चा ठेंगा

जीएसटी चा ठेंगा

Published On: Mar 06 2018 1:52AM | Last Updated: Mar 05 2018 11:38PMनगर : गोरख शिंदे

राज्यातील महापालिकांना दरमहा देण्यात येणार्‍या जीएसटी भरपाई अनुदानात  शासनाने मार्च महिन्यात तब्बल 466.87 कोटी रुपयांची कपात केली आहे. पुण्यासह 7 महापालिकांना मार्चचे अनुदानच देण्यात आलेले नाही. तर नगर, कोल्हापूर, पिंपरी-चिंचवड, नाशिक, औरंगाबादसह 15 महापालिकांच्या अनुदानात मोठी कपात करण्यात आल्याने, त्यांना मोठा आर्थिक फटका बसणार आहे. केंद्र शासनाच्या आदेशानुसार संपूर्ण देशासह राज्यातही वस्तू व सेवा कराची (जीएसटी) अंमलबजावणी 1 जुलै 2017 पासून सुरू झालेली आहे. त्यामुळे प्रवेशकर, जकात, स्थानिक संस्था कर, उपकर किंवा अन्य सर्व कर बंद करण्यात आले आहेत. त्या अनुषंगाने महापालिकांसह स्थानिक प्राधिकरणांना शासनाकडून दरमहा भरपाई अनुदान वितरित केले जात आहे. 

त्यानुसार राज्यातील 26 महापालिकांना फेब्रुवारी 2018 पर्यंत दरमहा एकूण 1394.68 कोटी रूपयांचे अनुदान दिले जात होते.  मात्र, मार्च 2018 च्या अनुदानात शासनाकडून तब्बल 466.87 कोटी रूपयांची कपात करण्यात आली आहे. त्यामुळे या महापालिकांच्या पदरात अवघे 927.81 कोटी रूपये पडले आहेत.  पुणे महापालिकेला दरमहा 137.30 कोटी रूपये अनुदान मिळत होते. मात्र, मार्चमध्ये पुण्यासह मिरा-भाईंदर, वसई-विरार, सोलापूर, कल्याण-डोंबिवली, परभणी व लातूर या महापालिकांना अनुदानच देण्यात आले नाही. बृहन्मुंबई महापालिकेला मात्र नेहमीप्रमाणे 647.34 कोटी रूपयांचे अनुदान मिळाले आहे. तर अमरावती, चंद्रपूर व नवी मुंबई महापालिकांना मार्चमध्ये वाढीव अनुदान देण्यात आले आहे. नगर, कोल्हापूर, पिंपरी-चिंचवड, नाशिक, औरंगाबादसह 15 महापालिकांच्या अनुदानात मोठी कपात करण्यात आल्याने, त्यांना आर्थिक अडचणींचा समाना करावा लागणार आहे.


देणी वसूल करण्यासाठी कपात!

महापालिकांना काही अटी-शर्तीच्या अधिन राहून दरमहा जीएसटी भरपाई अनुदान दिले जाते. त्यानुसार महापालिकांकडे असणारी शासकीय, निमशासकीय संस्थांची देणी या अनुदानातून वसूल अथवा समायोजित करण्याची कार्यवाही शासनाकडून केली जाते. त्यानुसार ही कपात करण्यात आल्याचे सांगण्यात येत असलेतरी, मार्च महिन्याच्या अनुदानाबाबत अध्यादेशात त्यासंदर्भात काही उल्लेख करण्यात आलेला नाही.

पूर्वीचे व कंसात मार्चचे अनुदान (कोटींमध्ये) बुहन्मुंबई 647.34 (647.34), पुणे 137.30 (0), पिंपरी-चिंचवड 128.97 (14.64), कोल्हापूर 10.35 (4.87), नगर 7.12 (0.03), नाशिक 73.40 (19.74), मिरा-भाईंदर 19.51 (0), जळगाव 8.74 (6.95), नांदेड-वाघाळा 5.68 (5.38), वसई-विरार 27.06 (0), सोलापूर 18.60 (0), औरंगाबाद 20.30 (13.60), उल्हासनगर 13.34 (9.36), अमरावती 7.83 (18.93), कल्याण डोंबिवली 19.92 (0), चंद्रपूर 4.49 (4.83), परभणी 1.54 (0), लातूर 1.25 (0), नागपूर 51.36 (27.21), ठाणे 59.30 (25.57), नवी मुंबई 77.92 (88.57), सांगली-मिरज-कुपवाड 10.95 (9.73), भिवंडी-निजामपूर 18.10 (16.81), मालेगाव 11.68 (6.79), धुळे 7.34 (5.10), अकोला 5.29 (2.36).