Tue, Feb 19, 2019 20:52होमपेज › Ahamadnagar › टँकरवरही जीपीएस प्रणाली!

टँकरवरही जीपीएस प्रणाली!

Published On: Feb 16 2018 1:53AM | Last Updated: Feb 15 2018 11:42PMश्रीरामपूर : प्रतिनिधी

‘तहान लागल्यावर विहीर खोदणे’ यापेक्षा तत्पूर्वीच तशी उपायोजना करण्यासाठी सरकारने पावले उचलली आहेत. उन्हाळ्यात संभाव्य पाणीटंचाई जाणवू नये, यासाठी गावागावांतील पिण्याची पाणीयोजना फेब्रुवारीपूर्वीच दुरुस्ती कराव्यात. तसेच टँकरचे प्रस्ताव चार दिवसांपेक्षा जास्तवेळ प्रलंबित ठेवू नयेत, याशिवाय टँकर घोटाळा रोखण्यासाठी टँकरवर जीपीएस प्रणाली बसवण्याच्याही महत्त्वपूर्ण सूचना सरकारने प्रशासनाला दिल्या आहेत. 

दरम्यान, या सूचनांची काटेकोर अंमलबजावणी झाल्यास निश्‍चितच उन्हाळ्यात पाणीटंचाई जाणवणार नसल्याचे मत व्यक्त केेले जात आहे.

राज्यात बहुतांशी वर्षी अपुर्‍या पर्जन्यामुळे किंवा अन्य कारणांमुळे पिण्याची पाणीटंचाई जाणवत असते, ती जाणवू नये, यासाठी सरकार उपयायोजना करीत आहे. त्यात पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाकडून काही सूचना करण्यात आल्या आहेत. 

टंचाईकाळात गरजेच्या असलेल्या उपाययोजनांना थेट मे व जून महिन्यात मंजुरी दिली जाते. मात्र, याकामी कुचराई होत असल्याने उन्हाळ्यात जनतेला पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. त्यासाठी फेब्रुवारीपूर्वीच गावातील नादुरुस्त पाणीयोजना दुरुस्ती करून घ्याव्यात, संभाव्य टंचाईग्रस्त गावांना नवीन विंधन विहिरी घ्याव्यात, संबंधित गावांतील नळयोजनांची कामे शीघ्र गतीने पूर्ण करावीत, तात्पुरत्या नळ योजनांचा वापर करावा, विहिरीची खोली करणे व गाळ काढणे हे कार्यक्रम हाती घेऊन नवीन स्त्रोत निर्माण करण्याकडेही प्रशासनाने लक्ष द्यावे, टंचाई काळात टँकर व वेळप्रसंगी बैलगाडीने पाणी पुरवठा करावा.

गावासाठी टँकर मंजुरीचे प्रस्ताव तहसीलदार, प्रांत, जिल्हाधिकारी कार्यालयांच्या स्तरावर चार दिवसांपेक्षा जास्तवेळ प्रलंबित ठेवू नये, याप्रकरणी जिल्हाधिकार्‍यांनी तात्काळ निर्णय घ्यावा. टँकरच्या बनावट फेर्‍या रोखण्यासाठी टँकरवर जीपीएस प्रणाली बसवावी, त्याचा खर्च संबंधित वाहतूकदाराने करावा. तसेच ज्या टँकरवर जीपीएस प्रणाली नसेल त्यांना देयक अदा करू नये, नळयोजना दुरुस्तीचे प्रस्ताव प्रलंबित ठेवू नये. तसेच टंचाई तक्रारी निवारण तत्परतेने करावे, याही सूचना देण्यात आल्या.