Wed, Jul 17, 2019 18:21होमपेज › Ahamadnagar › ग्रा. पं. सदस्याला दिली धमकी

ग्रा. पं. सदस्याला दिली धमकी

Published On: Aug 24 2018 12:40AM | Last Updated: Aug 23 2018 10:07PMनगर : प्रतिनिधी

ग्रामपंचायतीकडे रॉयल्टी न भरताच एका खासगी मोबाईल कंपनीची केबल टाकण्याचे काम ठेकेदाराकडून सुरू होते. रॉयल्टी भरून हे काम सुरू करावे, असे म्हणत ग्रामपंचायत सदस्य महेश झोडगे यांंनी हे काम थांबविले. त्याचा राग आल्याने आ. कर्डिले यांचे पुतणे संदीप कर्डिले व त्यांच्या साथीदारांनी झोडगे यांना शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी झोडगे यांच्या फिर्यादीवरून भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यात सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

या प्रकरणी पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, बुधवारी (दि.22) नागरदेवळे ग्रामपंचायत हद्दीतील राधानगर येथे एका खासगी मोबाईल कंपनीची केबल टाकण्याचे काम सुरू होते. यावेळी ग्रामपंचायत सदस्य झोडगे यांनी ठेकेदार तुषार गोरे यांच्याकडे हे काम करण्याची ग्रामपंचायतीकडून परवानगी घेतली आहे काय, तसे पत्र दाखवा, अशी मागणी केली. ठेकेदाराने कागदपत्रे दाखविण्यास असमर्थता दर्शविली. त्यामुळे झोडगे यांनी हे काम बंद पाडले.

त्यानंतर झोडगे तेथून घरी गेले. काही वेळाने आ. कर्डिले यांचे पुतणे संदीप कर्डिले हे सहकार्‍यांसह घटनास्थळी आले. यावेळी ठेकेदाराने भ्रमणध्वनी करून झोडगे यांना घटनास्थळी बोलावून घेतले. झोडगे घटनास्थळी आले असता, कर्डिले यांनी आमच्या कामात आडवा येऊ नको. नाही तर हात-पाय तोडीन, अशी धमकी दिली. त्यामुळे झोडगे यांनी तेथून काढता पाय घेतला. या प्रकरणी झोडगे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संदीप कर्डिले, वाघ (पूर्ण नाव समजले नाही), तुषार मोरे, कर्डिले यांच्या वाहनावरील चालक व इतर दोघे, अशा सहा जणांविरोधात भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.