Mon, May 27, 2019 08:42होमपेज › Ahamadnagar › निधी कमी पडू देणार नाही : काळे

निधी कमी पडू देणार नाही : काळे

Published On: Mar 17 2018 1:15AM | Last Updated: Mar 17 2018 1:15AMकोळपेवाडी : वार्ताहर

जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या माध्यमातून कोपरगाव तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी ग्रामसेवकांनी संबंधित विभागाशी संपर्क साधून विकासकामांचा आराखडा तयार करावा. तालुक्यातील कोणतीही विकास कामे निधीअभावी रखडू देऊ नका. निधी कमी पडत असल्यास जिल्हा परिषद व सरकारकडून तात्काळ निधी आणायची जबाबदारी माझी असेल, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते आशुतोष काळे यांनी केले.  

जि. प. चांदेकसारे गटाच्या प्रभाग समितीची सभा नुकतीच जि. प. सदस्या सोनाली रोहमारे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. त्याप्रसंगी ते बोलत होते. 

काळे म्हणाले की, उन्हाळ्याची चाहूल लागण्यास सुरुवात झाली आहे. कोपरगाव तालुक्यात ज्या- ज्या ठिकाणी पाणीटंचाई आहे. त्या-त्या गावातील ग्रामविकास अधिकार्‍यांनी तातडीने पाण्याच्या टँकरचे प्रस्ताव पाठवावेत. शिक्षण, आरोग्य, कृषी, बांधकाम व महिला बालकल्याण विभागाच्या अधिकार्‍यांनी आपापसात समन्वय ठेवून विकासकामांचा पाठपुरावा करावा. त्यामुळे जनतेच्या समस्या तातडीने सुटून विकासकामांना गती मिळणार आहे. प्रत्येक अधिकार्‍यांनी बैठक घेऊन कामाची जबाबदारी निश्‍चित करावी. घरकुल, दलितवस्ती सुधार योजना, लसीकरण मोहीम नळ पाणीयोजना मार्गी लावण्यासाठी पाठपुरावा करा. जिल्हा परिषद व पंचायत समितीचे सदस्य अतिशय अभ्यासू असून अधिकार्‍यांची उडवाउडवीची उत्तरे खपवून घेतली जाणार नाही, असा सज्जड इशारा दिला. 

सोनाली रोहमारे म्हणाल्या, अधिकार्‍यांनी प्रत्येक कामाचे महत्त्व जाणून प्राधान्याने विकासकामांचे प्रस्ताव तयार करून विकासकामे मार्गी लावावीत. तयार केलेल्या विकासकामांच्या प्रस्तावाची मला माहिती द्या. त्यामुळे विकास कामांचा पाठपुरावा करणे सोपे होत असल्याचे सांगितले.  

याप्रसंगी पं.स. सभापती अनुसया होन, पं. स. सदस्य बाळासाहेब राहाणे, राहुल रोहमारे, रोहिदास होन, प्रशांत वाबळे, बाबूराव थोरात, सचिन आव्हाड यांच्यासह प्रशासनातील विविध विभागाचे अधिकारी व कर्मचारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Tags : Ahamadnagar, Ahamadnagar News, Kopargaon taluka, development, Funding,