Fri, Jul 19, 2019 18:37होमपेज › Ahamadnagar › विखेंची ‘दक्षिण’ स्वारी पक्की?

विखेंची ‘दक्षिण’ स्वारी पक्की?

Published On: Jan 13 2018 1:10AM | Last Updated: Jan 12 2018 10:26PM

बुकमार्क करा
नगर : प्रतिनिधी

दक्षिण लोकसभा मतदारसंघातून डॉ. सुजय विखे हे निवडणूक लढविणार असल्याची चर्चा गेल्या वर्षभरापासून सुरु आहे. तशी तयारीही त्यांच्या यंत्रणेमार्फत सुरु असून खुद्द विखे यांनीही याबाबतचे संकेत वारंवार दिलेलेच आहेत. याच पार्श्‍वभूमीवर त्यांनी काल (दि.12) विळद घाट येथील संकुलात दक्षिणेतील प्रमुख नेत्यांची बैठक घेतल्याचे व यात सुजय विखे यांच्या निवडणूक लढविण्याच्या निर्णयावरशिक्कामोर्तब झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली. तशी चर्चाही नगरमधील विखे समर्थकांमध्ये सुरु आहे.

आगामी लोकसभेत दक्षिणेतून निवडणूक लढविणार असल्याचे संकेत डॉ. सुजय विखे यांनी यापूर्वी दिले आहेत. मात्र, यासंदर्भात त्यांनी राजकीय नेत्यांची बैठक घेऊन निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतल्याचे पुढे आले आहे. 

काल विळद घाटातील शिक्षण संकुलात नगर शहर व तालुका वगळता दक्षिणेतील सर्व तालुक्यातील काँग्रेसचे प्रमुख नेते व विखे समर्थक नेत्यांची बैठक पार पडली. जिल्हा परिषद अध्यक्षा शालिनीताई विखेंसह डॉ. सुजय विखे हेही या बैठकीस उपस्थित असल्याचे सांगण्यात आले. पक्ष, चिन्ह कोणतेही असो, निवडणूक लढवायची, असा निर्णय या बैठकीत घेण्यात आल्याचेही सांगितले जात आहे. तसेच प्रत्येक तालुक्यातील राजकीय परिस्थिती, तेथील सध्याचे वातावरण, घडामोडींवरही चर्चा झाल्याचे विखेंनी माहिती घेतल्याचे समजले. 

लोकसभा निवडणुकीच्या निर्णयाबाबत विखेंनी नेत्यांची बैठक घेण्याची ही पहिलीच वेळ असल्याने विखेंच्या ‘दक्षिण’ स्वारीवर शिक्कामोर्तब झाल्याची चर्चा शहरातील प्रमुख कार्यकर्त्यांमध्ये सुरु आहे. दरम्यान, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे हे काल जिल्ह्याच्या दौर्‍यावरच होते. विळद घाटातील बैठक झाल्यानंतर ते मुंबईला रवाना झाल्याचे सांगण्यात येत आहे.