Thu, Jul 18, 2019 10:36होमपेज › Ahamadnagar › सुक्ष्म सिंचनातून समृद्धीकडे वाटचाल! 

सुक्ष्म सिंचनातून समृद्धीकडे वाटचाल! 

Published On: Jun 02 2018 2:00AM | Last Updated: Jun 02 2018 12:42AMश्रीरामपूर : प्रतिनिधी

दिवसेंदिवस शेतीसाठी निर्माण होणारी शाश्‍वत पाण्याची समस्या लक्षात घेता बहुसंख्य शेतकर्‍यांनी सुक्ष्म सिंचनाचा पर्याय निवडला आहे. सरकारकडून जास्तीत जास्त क्षेत्र सुक्ष्म सिंचनाखाली आणावे, यासाठी कर्ज, अनुदानातून शेतकर्‍यांना प्रोत्साहित केले जात आहे. त्यामुळे गेल्या 7 वर्षांत जिल्ह्यात तब्बल 1 लाख 19 हजार 393 शेतकर्‍यांनी 74 हजार 734 हेक्टर क्षेत्रावर ठिबक आणि तुषार सिंचनावर शेती फुलविली आहे.

देशात सुक्ष्म सिंचनासाठी 9 हजार कोटींचा निधी सरकारने नुकताच जाहीर केला आहे. यात कर्ज आणि अनुदानाचेही साह्य केले आहे. साखर कारखान्यांनाही कार्यक्षेत्रात ठिबकचा वापर बंधनकारक करण्याचे आदेश आहेत. त्या पार्श्‍वभूमीवर जिल्ह्यात सुक्ष्म सिंचनाचा वापर करणार्‍या शेतकर्‍यांची संख्या आणखी वाढणार आहे.

वास्तविक जिल्ह्यात छोटी-मोठी धरणे, नद्या, तलावांची संख्या बर्‍यापैकी आहे. मात्र, समन्यायी कायद्याबरोबरच सरकारने धरणातील पाण्यावर औद्योगिक आणि पिण्यासाठी हक्क दाखविल्याने शेतीसाठीच्या पाण्यावर बंधने आली आहेत. त्यामुळे शेतकर्‍यांनी विशेषतः ऊसशेतीसाठी ठिबकचा वापर करावा व अन्य पिकांनाही सुक्ष्म सिंचनाचा पर्याय निवडावा, यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. दुसरीकडे ठिबकचा वापर केल्याने पाण्याची बचत होती.

जमिनीचा पोतही चांगला राहतो, पिकांना आवश्यक तेवढे पाणी मिळते, उत्त्पादनातही वाढ होते, मजुरी खर्च वाचतो आणि खते देण्यातही सुलभता येते. रोग व कीडीचा पादुर्भाव होत नाही. जमिनीची धूपही होत नाही. त्यामुळे मेहनत, वेळ व खर्चात बचत होते. इ. कारणांमुळे शेतकरीही स्वयंस्फूर्तीने सुक्ष्म सिंचनाकडे वळतो आहे. सरकारकडून यासाठी एकूण खर्चाच्या 45 ते 55 टक्के अनुदान दिले जाते. साधारणतः सात वर्षे या संचाचा शेतीसाठी वापर केला जातो. त्यामुळे गेल्या सात वर्षांतील आकडेवारी सुक्ष्म सिंंचनाचा आलेख दर्शवणारी आहे. 

सन 2011-12 ते सन 2017-18 या सात वर्षांचा आढावा घेतल्यास पहिले तीन वर्षे ठिबकचा वापर करणारे शेतकरी संख्या लक्षणीय होती. मात्र, त्यानंतर अनुदान मिळविण्यात अडचणी येऊ लागल्या, ठिबकसाठीचा खर्चही परवडेनासा झाला. दुष्काळाचे चटकेही खिशाला झळ देऊन गेले. त्यामुळे पुन्हा एकदा शेतकरी ठिबकपासून दुरावल्याचे चित्र आहे. मात्र, गेल्या दोन-तीन वर्षांत  नगरचा शेतकरी पुन्हा एकदा ठिबककडे वळाल्याचे स्पष्टपणे दिसून येते. 

सन 2017-18 या चालू वर्षात 10 हजार 614 शेतकर्‍यांनी 6991.23 हेक्टरवर ठिबक बसविले आहेत, तर 3350 शेतकर्‍यांनी 1700 हेक्टरवर तुषार सिंचनाचा उपयोग केला आहे. अशा प्रकारे 8692.21 हेक्टवर सुक्ष्म सिंचनाने शेती सुरू असून, त्यापोटी सरकारने 30 कोटी 99 लाख रुपये अनुदान देऊ केले आहे. चालू वर्षासह गेल्या सात वर्षांत जिल्ह्यात 1 लाख 6 हजार 323 शेतकर्‍यांनी 62 हजार 500 हेक्टरवर ठिबक आणि 13 हजार 70 शेतकर्‍यांनी 9234 हेक्टरवर तुषार सिंचनाचा शासकीय लाभ घेतला आहे. दोन्ही मिळून सात वर्षांत 75 हजार हेक्टरवर सुक्ष्म सिंचनाचा वापर झाला आहे. त्यापोटी सात वर्षांच्या कालखंडात 234 कोटींचे अनुदान यापोटी खर्च झाल्याचेही कृषीच्या अहवालानुसार समोर येत आहे.