Thu, May 23, 2019 04:20होमपेज › Ahamadnagar › नगरच्या उड्डाणपुलावर अखेर शिक्कामोर्तब!

नगरच्या उड्डाणपुलावर अखेर शिक्कामोर्तब!

Published On: Apr 23 2018 1:13AM | Last Updated: Apr 23 2018 12:54AMनगर : प्रतिनिधी

गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या शहरातील उड्डाणपुलावर अखेर केंद्र सरकारकडून शिक्कामोर्तब झाले आहे. सक्कर चौक ते स्टेट बँक चौक दरम्यान 3 किलोमीटरच्या उड्डाणपुलासाठी 278.62 कोटींच्या खर्चाची निविदाही नॅशनल हायवे अ‍ॅथोरिटीकडून प्रसिद्ध करण्यात आली आहे. दरम्यान, उड्डाणपुलाची निविदा प्रसिद्ध झाल्यामुळे खा. दिलीप गांधी यांच्या पाठपुराव्याला अखेर यश आले आहे.

सक्कर चौक ते कोठी दरम्यान प्रस्तावित असलेला उड्डाणपूल राजकीय व प्रशासकीय अडथळ्यांमुळे रखडला होता. अनेकवेळा या कामाचे भूमिपूजनही पार पडले. राज्य सरकारने ठेका दिलेल्या कंपनीने हे काम करण्यास नकार दिल्यानंतर लवादाकडे हा वाद प्रलंबित होता. दरम्यानच्या काळात केंद्राच्या भारतमालेत नगर शहराचा समावेश होऊन शहरातून जाणारे सर्व महामार्ग राष्ट्रीय महामार्गात रूपांतरित झाले. त्यानंतर खा. गांधी यांनी पुढाकार घेत केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांना उड्डाणपुलासाठी साकडे घातले होते. त्यानंतर काही महिन्यांपूर्वीच राज्य शासनाने जुन्या उड्डाणपुलाचा प्रस्ताव रद्द करुन सदरचा रस्ता केंद्र सरकारकडे वर्ग केला होता. अनेक वर्षांपासून उड्डाणपुलासाठी आश्‍वासने, घोषणा होऊनही प्रत्यक्ष कामाबाबत हालचाली होत नसल्यामुळे उड्डाणपूल होणार का? असा प्रश्‍न निर्माण झाला होता.

मात्र, केंद्र सरकारने 3 किलोमीटर लांबीच्या सक्कर चौक ते स्टेट बँक चौक दरम्यान चार पदरी उड्डाणपूलाचा प्रस्ताव मंजूर करत त्यासाठी 278.62 कोटींची तरतूद केली आहे. नॅशनल हायवे अ‍ॅथोरिटीकडून या कामासाठी निविदाही प्रसिध्द करण्यात आली असून जून पर्यंत निविदा प्रक्रिया पूर्ण होणार आहे. त्यानंतर प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे. दरम्यान, नगरकरांचा जिव्हाळ्याचा विषय असलेल्या उड्डाणपुलाचा प्रश्‍न अखेर मार्गी लागला आहे. त्यामुळे उड्डाणपुलाबाबत होणार्‍या उलट-सुलट चर्चांनाही अखेर पूर्णविराम मिळाला आहे. उड्डाणपुलाचा प्रश्‍न मार्गी लावल्याबद्दल खा. गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे आभार मानले आहेत.