Sat, Apr 20, 2019 15:51होमपेज › Ahamadnagar › मोफत दूध वाटप आंदोलनास सुरुवात

मोफत दूध वाटप आंदोलनास सुरुवात

Published On: May 04 2018 1:54AM | Last Updated: May 03 2018 11:13PMपुणतांबा : वार्ताहर

सरकारने दुधाला जाहीर केल्याप्रमाणे प्रतिलिटर 27 रुपये भाव द्यावा, या प्रमुख मागणीसाठी दूध उत्पादक शेतकरी, संघर्ष समितीच्यावतीने कालपासून लाखगंगा (ता. वैजापूर) येथे ‘लुटता कशाला फुकटच न्या’ असे मोफत दूध वाटप आंदोलनास सुरुवात करण्यात आली. भाववाढ न मिळाल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.

लाखगंगा येथे दि. 21 एप्रिलला विशेष ग्रामसभा घेऊन 3 मेपासून दूध दान करण्याचा निर्णय एकमताने घेण्यात आला होता. गेल्या वर्षी पुणतांबा येथे ग्रामसभा घेऊन शेतकरी संपाच्या माध्यमातून सरकारला कर्जमाफी घेण्याचा निर्णय घेण्यास भाग पाडल्यानंतर आता राज्यातील दूधउत्पादकांना भाववाढ मिळावी यासाठी येथून जवळच असलेल्या लाखगंगा या आंदोलनाचे केंद्र राहणार आहे. 

लाखगंगा येथील मारुती मंदिरात सकाळी 7 वाजता मारुतीस दुग्ध अभिषेक, महापूजा, तसेच भजन, कीर्तन होऊन आंदोलनास समिती डॉ. अजित नवले, धनंजय धोर्डे, दिगंबर तरकणे, महेश नवले, अनिल औताडे  यांच्या नेतृत्वाखाली सुरुवात झाली. या आंदोलनात औरंगाबाद, नगर जिल्ह्यातील दूधउत्पादक शेतकरी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते. सरकारने जाहीर केल्याप्रमाणे 27 रुपये प्रतिलिटर भाव तातडीने द्यावा. ‘लुटता कशाला फुकटच न्या’ अशा घोषणा देऊन गावातील व परिसरातून जमा झालेले दूध गरम करुन व साखर घालून गोड दुधाचे मोफत वाटप करण्यात आले.

यावेळी डॉ. नवले, धोर्डे, आ.सुभाष झांबड, जि.प. सदस्य पंकज ठोंबरे, राजेंद्र कराळे, पिंपळवाडी उपसरपंच जालिंदर तुरकणे, पं.स. उपसभापती प्रभाकर बारसे, प्रशांत सदाफळ, सतीश कानवडे, अण्णासाहेब थोरात, सखाहरी चंदने आदींनी भाषणे करुन सरकारच्या कृतीचा निषेध करून दूधभाव मिळाला नाही, तर आंदोलन तीव्र करण्यात येणार असल्याचा इशारा दिला. दि. 3 ते 9 मेदरम्यान राज्यात चौकाचौकांत मोफत दूध वाटप सप्ताह केला जाणार असल्याचे सांगण्यात आले.

यावेळी दुग्ध विकास मंत्री महादेव जानकर यांना ग्रामपंचायतीच्यावतीने सरकारने 21 जून 2017 रोजी काढलेल्या परिपत्रकानुसार 3.5 फॅट, 8.5 एस.एन.एफ. गुणवत्तेच्या दुधाला 27 रुपये भाव द्यावा, जाहीर भाव व प्रत्यक्षात मिळत असलेला भाव यातील अंतर भावांतर योजनेतर्गंत अनुदान देऊन हा फरक शेतकर्‍यांच्या नावे वर्ग करावा. दुधाला व ग्राहकांना रास्त भाव मिळावा, आदी मागण्यांचे निवेदन वैजापूरच्या तहसीलदार सुमन मोरे व जिल्हा दूध संघाचे आयुक्त शिरपूरकर यांना देण्यात आले. केशव मोरे यांनी सूत्रसंचालन केले.दुधाला योग्य भाववाढ मिळावी, यासाठी पुणतांबा येथील बजरंग वाडीतील शेतकर्‍यांनी दूध रस्त्यावर ओतून सरकारचा निषेध केला.