होमपेज › Ahamadnagar › झेडपीत मोफत ‘वाय-फाय’!

झेडपीत मोफत ‘वाय-फाय’!

Published On: Feb 03 2018 2:26AM | Last Updated: Feb 02 2018 11:58PMनगर : प्रतिनिधी

जिल्हा परिषदेच्या नवीन प्रशासकीय इमारतीत कर्मचार्‍यांना व कामानिमित्त येणार्‍या अभ्यंगतांना बीएसएनएलच्या मोफत वाय- फाय सुविधेचा लाभ मिळणार आहे. ही सुविधा कार्यान्वित करण्यासाठी स्थायी समितीच्या सभेत मंजुरी देण्यात आली आहे. त्यासाठी जिल्हा परिषदेला कुठलाही खर्च करावयाचा नसल्याने सर्व विभागांसह अभ्यागतांना मोफत इंटरनेट सुविधा मिळणार आहे.

समितीची सभा अध्यक्षा शालिनी विखे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. सभेस उपाध्यक्षा राजश्री घुले, सभापती अजय फटांगरे, उमेश परहर, अनुराधा नागवडे, सदस्य संदेश कार्ले, सदाशिव पाचपुते, अनिल कराळे, प्रताप शेळके, माधव लामखडे, सुप्रिया पाटील, अनिता हराळ आदींसह प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

सुरक्षित पिण्याच्या पाण्याचा प्रकल्प पाहण्यासाठी जिल्हा परिषद सदस्यांचा अभ्यास दौरा फेब्रुवारी महिन्यात तेलंगणा राज्यातील मेडक जिल्ह्यात गजवेल येथील कोमाटीबांडा येथे नेण्यात येणार आहे. याबाबत ग्रामपंचायत विभाग व लघू पाटबंधारे विभागाने नियोजन करण्याच्या सूचना देण्यात आल्या. जिल्हा परिषदेच्या आवारात एटीएम सुरु करण्यात येणार आहे. त्याच्या वीजबिलाची रक्कम संबंधित बँकेने अदा करावी व एटीएमच्या सुरक्षिततेसाठी वॉचमन नियुक्त करण्याच्या अटीवर त्याला मान्यता देण्यात आली.

जिल्हा परिषदेच्या सेवानिवृत्त शिक्षक, कर्मचारी यांचे निवृत्ती वेतन दरमहा एक तारखेला द्यावे. तसेच अंगणवाडी सेविका, मदतनीस यांचे मानधन वेळेत अदा करण्याच्या सूचना देण्यात आल्या. तसेच पशुवैद्यकीय दवाखान्याचे निकृष्ठ काम, शाळा खोल्यांचे निर्लेखन याबाबत कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.