Fri, Apr 26, 2019 19:21होमपेज › Ahamadnagar › खासदार दिलीप गांधींसह चौघांविरूद्ध गुन्हा

खासदार दिलीप गांधींसह चौघांविरूद्ध गुन्हा

Published On: Feb 24 2018 2:11PM | Last Updated: Feb 24 2018 4:11PMनगर : प्रतिनिधी

कट रचून मारहाण, अपहरण करून खंडणी मागितल्याप्रकरणी भाजपाचे खासदार दिलीप गांधी, त्यांचे सुपूत्र नगरसेवक सुवेंद्र गांधी यांच्यासह चौघांविरुद्ध एमआयडीसी पोलिस ठाण्यात आज (दि.२४) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर भूषण गोवर्धन बिहाणी यांनी ही फिर्याद दाखल केली आहे.

आरोपींमध्ये गांधी पिता-पुत्रांसह पवन प्रकाश गांधी (दोघे रा. सथ्था कॉलनी, नगर), सचिन गायकवाड (रा. श्रीगोंदा) यांचाही समावेश आहे. 
खासदार दिलीप गांधी यांनी बिहाणी यांच्या फोर्ड शोरुममधून जानेवारी २०१५ मध्ये फोर्ड एन्डेव्हर कार खरेदी केली होती. २७ जून २०१६ रोजी पवन गांधीला विकली. त्यानंतर पुन्हा ३० जुलै २०१६ रोजी देवेंद्र गांधीला विकली.

सदर गाडीत दोष असल्याच्या तक्रारी गांधी यांनी केल्या. त्यानंतर २९ सप्टेंबर २०१५ रोजी सुवेंद्र गांधी व त्याच्या साथीदारांनी शोरुममधील वितरण व्यवस्थापक व व्यवस्थापक असलेल्या सुशील ओस्तवाल व अजय रसाळ यांचे अपहरण केले. निर्जनस्थळी घेऊन जाऊन बंदुकीचा धाकाने सचिन गायकवाड याच्या खात्यावर आरटीजीएसद्वारे १६ लाख ७४ हजार रूपये जबरदस्तीने जमा करायला लावले. त्यानंतर जबरदस्ताने नोटरी करून घेत उसनवारी दाखविली होती. शोरुममधील १० फोर्ड इको कार, कागदपत्रांसह घेऊन गेले. त्याबदल्यात खंडणीची मागणी केली. नंतरच्या काळात १० पैकी ९ कार त्यांनी परत केल्या व एक कार खासदार गांधी यांची मुलगी स्मिता हिच्यासाठी ठेवून घेतली. त्यापोटी ५ लाख रुपये त्यांनी जमा केले. खासदार गांधी यांनी पदाचा वापर करुन बिहाणी यांच्या विरोधात मंत्र्यांकडे, आयकर व विक्रीकर विभागाकडे तक्रारी करुन त्यांना त्रास दिला आहे.
याप्रकरणी बिहाणी यांनी २१ नोव्हेंबर २०१६ रोजी पोलिस अधीक्षकांकडे याबाबत तक्रार अर्ज दाखल केला होता. मात्र, गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता. त्यामुळे भूषण बिहाणी यांनी उच्च न्यायालयात क्रिमिनल रिट याचिका दाखल केली होती.

याचिकेवर सुनावणी होऊन औरंगाबाद खंडपीठाने शुक्रवारी खासदार दिलीप गांधी, सुवेंद्र गांधी, पवन गांधी (तिघे रा. नगर) व सचिन गायकवाड (रा. श्रीगोंदा) यांच्या विरूद्ध तात्काळ गुन्हा दाखल करण्याचे आदेश पोलिस प्रशासनाला दिले आहेत. त्यानुसार बिहाणी यांनी आज फिर्याद दिली असून त्यानुसार एमआयडीसी पोलिस ठाण्यात  गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

हा गुन्हा उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार या गुन्ह्याचा तपास सीआयडीकडे वर्ग करण्यात येणार आहे.